चित्रपटातील महिलांची प्रतिमा बदलतेय...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

कोल्हापूर - गेल्या दोन दशकांत महिलांची चित्रपटांतील प्रतिमा बदलते आहे. ती केवळ एक सोशीक असल्याची प्रतिमा हद्दपार होत असून तिला तिच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहे. त्याचमुळे तिची ही बदलणारी प्रतिमा चित्रपटातूनही प्रकर्षाने पुढे येते आहे आणि वैचारिक पातळीवर प्रेक्षकांनी ती स्वीकारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, असा सूर आज कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत झालेल्या मुक्तसंवादातून व्यक्त झाला. चित्रपट समीक्षक रेखा देशपांडे, योगेश्‍वर गंधे यांचा संवादात सहभाग होता.

चित्रपटांच्या बदलत्या प्रवाहाबरोबर महिलांची प्रतिमाही बदलली, याचे दाखले देताना "क्वीन' चित्रपटापासून ते "सातच्या आत घरात' या चित्रपटापर्यंतचे विविध दाखले संवादातून दिले गेले. महिलांनी एका विशिष्ट चौकटीतच राहावे, अशा आशयाचे काही चित्रपट अजूनही येतात. पण ही चौकट मोडणे महिलांच्याच हातात आहे. किंबहुना बहुसंख्य चित्रपट महिला स्वातंत्र्यावर बोलतात आणि हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हेसुद्धा आवर्जून सांगतात, अशी मतेही यावेळी व्यक्त झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा संवाद अधिक खुलवला.

दरम्यान उद्या (ता. 25) महोत्सवांतर्गत झालेल्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार आहे. यानिमित्ताने त्यांचा जल्लोषही अनुभवायला मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात स्थानिक लघुपटकर्त्यांनी केलेल्या लघुपटांचा अधिक समावेश असून यानिमित्ताने ही सारी मंडळी एकवटणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरणाचा सोहळा होणार आहे.