'जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

सांगली - उत्पादन व्यवस्था, साधनात बदल झाला की अर्थकारण बदलते. त्याचा समाजावर सर्वस्पर्शी परिणाम होतो. इंटरनेटने या व्यवस्थेला व्यापल्यामुळे ते घडले आहे. परिणामी, सध्या उपलब्ध असलेल्यापैकी 60 टक्के रोजगार येत्या दहा वर्षांत बंद झालेले दिसतील, असे मत "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. येथे मिरज विद्यार्थी संघ आयोजित 92 व्या वसंत व्याख्यानमालेत समारोप सत्रातील पुष्प त्यांनी गुंफले. "नवसमाज माध्यमे आणि आंतरसंवादी समाज' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. मुकुंद पाठक अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार दि. रा.

सांगली - उत्पादन व्यवस्था, साधनात बदल झाला की अर्थकारण बदलते. त्याचा समाजावर सर्वस्पर्शी परिणाम होतो. इंटरनेटने या व्यवस्थेला व्यापल्यामुळे ते घडले आहे. परिणामी, सध्या उपलब्ध असलेल्यापैकी 60 टक्के रोजगार येत्या दहा वर्षांत बंद झालेले दिसतील, असे मत "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. येथे मिरज विद्यार्थी संघ आयोजित 92 व्या वसंत व्याख्यानमालेत समारोप सत्रातील पुष्प त्यांनी गुंफले. "नवसमाज माध्यमे आणि आंतरसंवादी समाज' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. मुकुंद पाठक अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार दि. रा. घोरपडे यांच्या स्मृतिनिमित्ताने व्याख्यान झाले. 

श्री. पवार म्हणाले,""माध्यमांची व्याख्या विस्तारतेय. वॉट्‌सऍप, फेसबुकसह नवसमाजमाध्यमांची भर पडतेय. पारंपरिक माध्यमातील कोणती माहिती प्रसारित करायची यावर असणारे बंधन कालबाह्य ठरले. ज्ञानाची मक्तेदारी गतीने मोडीत निघतेय. पारंपरिक माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे. नवसमाजमाध्यमे उथळ-थिल्लरपणे चारित्र्यहननही करताहेत. माध्यम बदल नवा नसला तरी यावेळची गती अभूतपूर्व आहे. प्रगत देशातील वृत्तपत्रांचा वाचक घटत असला तरी आफ्रिका-आशियाई देशातील वाढ कायम आहे. दहा वर्षांत भारतात 2.32 कोटी म्हणजे 7 ते 8 टक्के नवीन वाचकांची भर पडली. नव समाजमाध्यमांची वाढ वार्षिक 30 टक्के आहे.'' 

ते म्हणाले,""इंटरनेट श्रीमंत आणि इंटरनेट गरीब अशी विभागणी होतेय. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या "दाओस' परिषदेने पुढील दहा वर्षांत सध्याचे साठ टक्के रोजगारमार्ग बंद होतील, असा निष्कर्ष काढला आहे. कोडॅकसारखी पावणेदोन लाख कर्मचारी असलेली कंपनी बंद पडून तिची जागा इन्स्ट्राग्रामने घेतली. जी 45 कर्मचाऱ्यांकडून चालवली जाते.'' 

श्रीकांत यडुरकर यांनी अहवाल वाचन केले. विष्णू तुळुपुळे यांनी परिचय करून दिला. माजी नगरसेवक मकरंद देशपांडे यांनी आभार मानले. अदिती करमरकर हिने पसायदान गायले. सुहास दिवेकर यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम्‌ने सांगता झाली. 

प्रत्येक हालचालीवर बाजारपेठेचे लक्ष 

श्रीराम पवार म्हणाले,""तुमच्या जगण्यावर या माध्यमांचे आक्रमण होऊन खासगीपणही संपुष्टात आले आहे. तुमच्या प्रत्येक हालचालीवर बाजारपेठेचे लक्ष आहे. नवसमाजमाध्यमांनी एकमेकांशी जोडलेला हा समाज अर्थकारण व सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी सतत देवाण-घेवाण करणारा असेल. त्याचे अटळ असे नवे आंतरसंघर्षही तयार होतील.''