दूध संस्थांना सरकारने अनुदान देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

यशवंतनगर - शासनाने दिलेला दूधदर उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, परंतु सहकारी संस्था तोट्यात जाऊ नयेत, यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यभरातील सहकारी दूध संघांच्या बैठकीत आज येथे करण्यात आली. सहकारी दूध संघांपुढील अडचणी व त्यावरील उपाय याबाबत खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शिवामृतचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महानंद डेअरी, श्री वारणा दूध संघ, राजाराम बापू पाटील दूध संघ, सोलापूर जिल्हा दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ, शिवामृत दूध संघ, मोहनराव शिंदे दूध संघ, सोनहिरा दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ, नेवासा दूध संघ, गोकुळ दूध संघ, फलटण तालुका दूध संघ, वसंतदादा दूध संघ, बारामती तालुका दूध संघ, कोयना दूध संघ, कोल्हापूर जिल्हा दूध संघ, गोदावरी खोरे दूध संघ व फत्तेसिंग नाईक दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खासगी संघ शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा कमी दर देतात. त्यांच्यावर दूधदराबाबत कोणतेही बंधन नाही. खासगी संघ कमी दराने खरेदी-विक्री करू शकतात, मात्र सहकारी संघांवर बंधने आहेत. सहकारी संघ तोट्यात जात आहेत, या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

'दूधदर, अतिरिक्त दूध, दूध पावडर, अनुदान याबरोबरच खासगी अनिर्बंध संस्था, भेसळ याबाबत आपण व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मिळून दुग्धविकास मंत्र्यांकडे बैठक घेऊ,'' असे या वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.