ग्रामीण- शहरी असमतोलावर शिक्षण हाच उतारा - अनिल काकोडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - ग्रामीण भागातील तरुणाईची ज्ञानाधिष्ठित क्षमतावृद्धी करण्यात उच्चशिक्षण प्रणालीने पुढाकार घेतला पाहिजे. असे झाल्यास सध्या दिसणारा ग्रामीण- शहरी आर्थिक असमतोल दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी गुरुवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या 53 व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.

कोल्हापूर - ग्रामीण भागातील तरुणाईची ज्ञानाधिष्ठित क्षमतावृद्धी करण्यात उच्चशिक्षण प्रणालीने पुढाकार घेतला पाहिजे. असे झाल्यास सध्या दिसणारा ग्रामीण- शहरी आर्थिक असमतोल दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी गुरुवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या 53 व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.

उच्च शिक्षणाच्या बदलत्या दिशांचा वेध घेण्याची गरज व्यक्त करत काकोडकर यांनी आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले, '2011 च्या जनगणनेनुसार 121 कोटी भारतीयांपैकी 83.3 कोटी लोक (68.8 टक्के) ग्रामीण भागात राहतात. केंद्र सरकारच्या एका तज्ज्ञ समितीच्या अंदाजानुसार, ग्रामीण कुटुंबांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा शहरी भागातील कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट आहे. आणखी एका सामाजिक- आर्थिक पाहणीनुसार प्रत्यक्ष शेती करणारे 30 टक्के, मजुरी- रोजंदारी करणारे 51 टक्के अशी ग्रामीण उत्पन्नाची विभागणी होते. केवळ 9 टक्के ग्रामीण कुटुंबे नोकरीवर अवलंबून आहेत. तब्बल 56 टक्के लोक भूमिहीन असल्याचेही वास्तव आहे. याचा विचार करता शेतीच्या पलीकडे जाऊन उत्पन्नाची साधने शोधली पाहिजेत, ज्यायोगे शहरी उत्पन्नाच्या जवळपास जाता येईल.''

शिक्षण म्हणजेच ग्रामीण विकासाचा स्तंभ आहे. सुशिक्षित विद्यार्थी समाजातील समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील. शिक्षण हे जीवनभर चालत राहणारे आहे. प्रत्येक वेळी जीवनात नवनवीन शिकावे लागते. मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रयत्न करणे यातूनच प्रगती होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, 'विद्यार्थ्यांनो, पदवीनंतर नव्या युगात प्रवेश करणार आहात. अंगभूत कौशल्य, आत्मविश्‍वास आणि सृजनशीलतेच्या बळावर पुढील जीवन जगायचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, प्राचार्य डॉ. शिरीष पवार आदी उपस्थित होते.

गुणवंतांना पदक
सर्वसाधारण कौशल्याचे "राष्ट्रपती सुवर्णपदक' सोनाली अजय बेकनाळकर हिला, तर स्नेहल शिवाजी चव्हाण हिला "कुलपती पदक' प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर यांच्या हस्ते बहाल केले. सोनाली ही विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागातील भाग दोनची विद्यार्थिनी आहे. स्नेहल साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

Web Title: The yield on rural education and urban imbalance