झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच हाेणार - चंद्रकांत पाटील

झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच हाेणार - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भाजपचाच असेल. आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज आहे; पण भाजपकडे ४० सदस्य असतील, असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजपला मिळालेले यश म्हणजे गोरगरीब जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे आणि जनतेने विकासाला साथ दिल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळालेल्या विक्रमी यशाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेले यश हे पंतप्रधान मोदी यांच्यावरील विश्‍वासाचे प्रतीक आहे. तेच देशाचा खऱ्या अर्थाने विकास करू शकतील. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वांत मोठा नेता म्हणून पंतप्रधान श्री. मोदी यांचा उल्लेख केला पाहिजे. बहुमतापेक्षा अधिक यश मिळाले आहे. नोटाबंदीविरुद्ध आणि जातिवादाविरुद्ध विरोधकांनी रान उठवले. हा मुद्दा अडचणीचा ठरतो की काय अशी भीती होती; परंतु भाजपचा विजय म्हणजे जनतेने विरोधकांना दिलेली चपराकच म्हणावी लागेल. नोटाबंदीनंतर लोकांना निश्‍चितच त्रास झाला; पण त्रास सहन करून जनतेने भाजपला मतदान केले. नोटाबंदीच्या निर्णया वेळी मला पन्नास दिवस द्या, त्यानंतर सर्व सुरळीत झाले नाही तर मला चौकात फटके मारा, असेही पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, आता पन्नास दिवसांनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्या आहेत. काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. पंतप्रधान कोणताही निर्णय स्वार्थासाठी घेत नाहीत हे लोकांच्या लक्षात आल्याने त्रासही सहन करून त्यांच्यावरचा विश्‍वास व्यक्त केला आहे.

नोटाबंदी, जनधन योजना, शौचालये, वीज अशा विकासालाच जनतेने साथ दिली आहे. अडीच-तीन वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकलेले नाहीत. निवणुकीतील विजयनांतर आता उत्तर प्रदेशमध्ये नव युग सुरू होऊन विकासाचे राजकारण आता चालेल.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासंबंधी विचारले असता ते म्हणाले, की जिल्हा परिषदमध्ये भाजपला लोकांनी पसंती दिली आहे. भाजपने प्रथमच मुसंडी मारत क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी यांची युती या निवडणुकीत होती. यामुळेच आमच्या युतीकडे सर्वाधिक सदस्य आहेत. २१ मार्चला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचाच उमेदवार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवडला जाईल. या निवडीच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज आहे. पण, भाजपकडे ४० सदस्य आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू आतापासूनच सरकण्यास सुरवात झाली आहे.

त्यांना दिशा कळेल
शिवसेना बरोबर येणार का, यावर ते म्हणाले, की ज्याला राजकारण कळते त्याला दिशा कळते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळालेल्या यशाने दिशा निश्‍चित झाली आहे. विकास कोण करू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. ज्यांना विकास करायचा आहे, काम करायचे आहे ते आपोआपच भाजपकडे येतील, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com