शरद पवार आज कोणता मार्ग दाखविणार?

शरद पवार आज  कोणता मार्ग दाखविणार?

सातारा - भारतीय जनता पक्षाची वाढती ताकद, काँग्रेसकडून होणारी धोकेबाजी आणि खासदार उदयनराजेंनी स्थापन केलेली राजधानी जिल्हा विकास आघाडी या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधकांसह स्वकीयांशी दोन हात करत जिल्हा परिषद निवडणुकीत आपली ताकद अबाधित ठेवावी लागण्यासाठी झगडावे लागणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार कोणती रणनीती जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ उद्या (गुरुवारी) शेंद्रे येथील अजिंक्‍यतारा साखर कारखान्यावरील कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे. या मेळाव्यास पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार सातारा जिल्ह्यासाठी कोणती रणनीती ठरविणार यावर बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे यशापयश अवलंबून आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकेकाळचा मित्रपक्ष व केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सत्तेतील भागीदार असलेल्या काँग्रेसने जिल्ह्यातील राष्ट्रवादीला राजकारणाच्या विविध टप्प्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यातील सर्व पातळ्यांवर काँग्रेसचे नेते यशस्वी ठरले; पण राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला हातून सुटलेला नाही. केवळ काही बुरूज ढासळले आहेत. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिनी मंत्रालयावरील राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढण्याची रणनीती काँग्रेसकडून आखली जाणार होती; पण शहकाटशहाच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा काँग्रेसचे माणचे आमदार जयकुमार गोरे हे विनयभंग प्रकरणात अडकलेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील व इतर काँग्रेसजनांची राष्ट्रवादी विरोधातील मोहीम सध्यातरी थंडावली आहे. दुसरीकडे गेली काही वर्षे सुप्तावस्थेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने पालिका निवडणुकीपासून उसळी घेतली आहे. आता भाजपचे जिल्हा परिषद व अकरा पंचायत समित्यांत चंचूप्रवेश मिळविणे हेच टार्गेट आहे. त्यासाठी त्यांनी बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळविण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीतील काही नाराजांना पक्षात घेऊन त्यांनाच राष्ट्रवादीविरोधात वापरले जाणार आहे. 

यापेक्षा सर्वात अडचणीची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यांची भूमिका पक्षाला अडचणीची ठरणार आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. या इच्छुकांना थोपविताना बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. बंडखोर विरोधकांच्या हाताला लागले, तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार निश्‍चित आहे;

पण पालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी सावध पवित्रा घेत, जिल्हा परिषदेवर पुन्हा झेंडा फडकविण्याची तयारी केली आहे. आता प्रत्येक आमदाराने आपापल्या मतदारसंघासह तालुक्‍यातील गट, गणांत वैयक्तिक लक्ष घालून दगाफटका टाळण्यावर भर दिला आहे. एकवटलेले विरोधकांना धुळ चारून पुन्हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. त्यासाठी उद्या (गुरुवारी) पक्षाचे अध्यक्ष  खासदार शरद पवार हे शेंद्रे येथील कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनीती जाहीर करतील. यामध्ये खासदार उदयनराजेंविरोधात त्यांची काय भूमिका राहणार, याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेसह पक्षाच्या नेत्यांनाही आहे. उदयनराजेंसह की उदयनराजेंविना आगामी निवडणुका लढा, यापैकी काय सांगणार याची उत्सुकता आहे.

उदयनराजे उपस्थित राहणार का?
अजिंक्‍यतारा कारखान्यावरील मेळाव्याच्या पत्रिकेत खासदार उदयनराजे यांचे नाव नाही. कारण हा कार्यक्रम कारखान्याचा आहे, असे सांगितले जात आहे; पण येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यास खासदार उदयनराजे उपस्थित राहिल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांची गोची होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com