सत्तेचा सोपान चढण्यास भाजपची चढाओढ

zp-sangli-election
zp-sangli-election

सांगली - जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपने स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी दंड थोपटलेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर एक खासदार आणि चार आमदारांमुळे भाजप जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. त्यातच जिल्ह्यात खिळखिळी होत चाललेली राष्ट्रवादी, वर्चस्व वादाच्या अंतर्गत गटबाजीने ग्रासलेली कॉंग्रेस व त्यांचे नेते यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकू शकतो, असे स्वप्न आता त्यांच्या नेतृत्वाला पडू लागल्याने सत्तेचा सोपान चढण्यास भाजपची चढाओढ सुरू झाली आहे. अन्य पक्षांतील आयारामांसाठी दरवाजेही त्यांनी उघडे ठेवले असून काही तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी साटंलोटंही केलं आहे.

एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रवादीला तीन वर्षांत खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. तासगावचे संजय पाटील, जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख, शिराळ्याचे शिवाजीराव नाईक हे सगळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले. घोरपडे वगळता सर्वांना फळे मिळालीही. संजय पाटील खासदार, विलासराव जगताप व शिवाजीराव नाईक आमदार झाले. पृथ्वीराज देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष बनले. हे सर्वजण त्यांच्या तालुक्‍यात मातब्बर आहेत. आपल्या भागातील सेनापतीच. त्यांची ताकद चांगली आहे. शिवाय सांगली, मिरजेतही भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवू शकतो, असा विश्‍वास नेत्यांना वाटू लागला आहे.

भाजपचे अस्तित्व मर्यादित
जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार जरी भाजपचा असला तरी हे सर्वजण "नमो' लाटेत निवडून आलेत यात शंका नाही. मात्र त्याची मात्रा जिल्हा परिषदेला लागू पडेल का हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही पक्षाचे जिल्ह्यात बस्तान बसलेले नाही याची कबुली खुद्द जिल्हाध्यक्षांनीच दिलीय. आजही कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा, खानापूर, आटपाडी, पलूस तालुक्‍यांत भाजप कमकुवत आहे हे मान्य करावे लागते. तासगाव, जत वगळता इतर तालुक्‍यांतही त्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय. शिवाय तासगावात दिवंगत आर. आर. आबा गटाच्या नेत्या आमदार सुमन पाटील आणि जतमध्ये कॉंग्रेसचे विक्रम सावंत आपली ताकद कायम ठेवून संघर्ष करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही तालुक्‍यात भाजपला एकतर्फी यश मिळण्याची शक्‍यता सध्या तरी दिसत नाही.

नेतृत्वाच्या मर्यादा

मावळत्या जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. त्याच भाजपला इतिहासात प्रथमच सत्ता मिळण्याची खात्री वाटू लागली असली तरी त्यांच्या नेत्यांतही सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. खासदार संजय पाटील यांच्याकडे धमक असली तरी ते अजूनही तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. उलट पक्षाध्यक्ष देशमुख आणि अजितराव घोरपडे यांच्याशी त्यांचे सख्य नसल्याने तोटे जास्त होत आहेत. घोरपडेंशी त्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. घोरपडे भाजपविरोधात आघाडीच्या तयारीत आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात घोरपडे यांना रोखण्यासाठी त्यांना ताकद खर्च करावी लागत आहे.
तासगावात त्यांना नगरपालिकेत मोठा संघर्ष करावा लागला. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी त्यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. हातनूरचे सुभाष पाटील (आर. आर. पाटील समर्थक) यांना भाजपात घेऊन त्यांनी जागा वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र सर्वांत महत्त्वाचे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष, खासदार पाटील यांचे चुलते डी. के. काका पाटील हे सुद्धा भाजपमध्ये आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. तर मिरज पूर्व भागातील मालगावचे सुरेश खोलकुंबे हेही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आर. आर. पाटील गटाने जोरदार टक्कर देत जवळपास निम्म्या ग्रामपंचायती जिंकल्या हे विसरून चालणार नाही.

देशमुखांचा कॉंग्रेसला पहिला धक्‍का...
पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व असले तरी त्यांनाही कडेगाव, पलूसच्या बाहेर तशी क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. ती या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येईल. विलासराव जगताप यांचे तालुक्‍यावर वर्चस्व आहे. मात्र त्यांना विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचे आव्हान आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांच्यासमोर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान आहे. मात्र त्यांनी मानसिंग नाईक गटाला खिंडार पाडल्याने त्यांची बाजू भक्कम दिसत आहे. त्या तुलनेत देशमुखांना कडेगाव, पलूसमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादीला थेट खिंडार पाडता आले नसले तरी अरुण लाड यांच्याशी युती करून कॉंग्रेसमोर आव्हान उभे केले आहे.

सांगली, मिरजेतील आमदारांची ताकद कुठाय?
सांगली, मिरजेचे आमदार भाजपचे असले तरी अजून त्यांना आपले गट भक्कम करता आले नाहीत. मुळात या दोन्ही आमदारांचा राजकीय पिंड नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी गट बांधायचे असतात हे त्यांच्या गावीही नाही. इतर निवडणुकीत तुम्ही कुठेही असा विधानसभेला आमच्यासोबत या म्हणजे झालं असे त्यांचे राजकारण आतापर्यंत चालले आहे. पण आता वरूनच आदेश आल्याने त्यांनाही या निवडणुकीत पक्षासाठी झटावे लागणार आहे. त्यासाठी ते काय करतात आणि त्यांच्या मतदार संघात किती जागा मिळवतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

खानापूर, आटपाडी आणि वाळव्यात मात्र भाजप बॅकफूटवर दिसत आहे. जयंत पाटील यांना रोखण्यासाठी वाळव्यात सर्वपक्षीय आघाडी करून जाण्यात शहाणपणा आहे आणि तो सर्वांनी दाखवला आहे. आटपाडीत राजेंद्रअण्णा देशमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तेथे भाजपला प्रवेशाची दारे उघडण्याची आशा आहे.

नाराजीची कारणे
भाजप आजच्या घडीला जरी जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर दिसत असला तरी त्यांना सत्तेचा सोपान गाठणे तेवढे सोपे नाही. नेत्यांतील दुरावा, ऐनवेळी येणाऱ्यांना प्रवेश आणि उमेदवारी देण्याची गडबड. जुन्या निष्ठावंतांना डावलण्यामुळे अंतर्गत वाढता विरोध ही नाराजीची कारणे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा वरचढ असले तरी कॉंग्रेसचे आव्हान थोपवून सत्ता मिळवणे भाजपला सोपे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com