कर्णकर्कश्‍श दणदणाट कायम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७ डेसिबलची घट

पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’चा थरार, उडती गाणी आणि ढोल-ताशांचा कर्णकर्कश्‍श दणदणाट कायम होता. या वर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी १.७ डेसिबलने कमी म्हणजेच ९०.९ डेसिबल इतकी नोंदविली गेली एवढाच काय तो फरक. पण हा आकडादेखील सामान्य माणसांच्या आरोग्याला हानीकारक असाच आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत १.७ डेसिबलची घट

पुणे - यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’चा थरार, उडती गाणी आणि ढोल-ताशांचा कर्णकर्कश्‍श दणदणाट कायम होता. या वर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी १.७ डेसिबलने कमी म्हणजेच ९०.९ डेसिबल इतकी नोंदविली गेली एवढाच काय तो फरक. पण हा आकडादेखील सामान्य माणसांच्या आरोग्याला हानीकारक असाच आहे. 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) शहराच्या दहा चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी (ता. ५) दुपारी बारा, चार आणि रात्री आठ वाजता तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा, पहाटे चार आणि सकाळी आठ या काळातील आवाजाची पातळी मोजली. त्यावरून प्रमुख निदर्शने नोंदविली. गेल्या वर्षी मिरवणुकीतील आवाजाची सरासरी पातळी ९२.६ डेसिबल होती. या वर्षी ही पातळी ९०.९ इतकी नोंदविली गेली आहे. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महेश शिंदीकर यांच्यासह मुरली कुंभारकर, नीलेश वाणी, अतुल इंगळे, सतीश सुखबोटलावार, सुदेश राठोर, गणेश ठोमरे, तुषार राठोड, श्रीकृष्ण मोकाडे, नागेश पवार, राजेश सज्जन, श्रीकांत चांभारे, अमोल राऊत, आकाश राठोड यांनी त्यासाठी काम केले.
आवाजाची सरासरी पातळी ९०.९ डेसिबल असली, तरी गणपती चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री आठ वाजता आवाजाची पातळी शंभर डेसिबल अशा कर्णकर्कश्‍श पातळीवर होती. याच दिवशी रात्री आठ वाजता टिळक चौकात ही पातळी ९९.२ डेसिबल, तर खंडोजीबाबा आणि कुंटे चौकात ९७.८ डेसिबल होती. कुंटे चौकात दुसऱ्या दिवशी (ता. ६) सकाळी आठ वाजता प्रचंड दणदणाट १०१ डेसिबल एवढा होता. बहुतांश मंडळे टिळक चौकात थांबतात आणि ढोलताशांचे सादरीकरण करतात. ‘डीजे’चा थरारही असतो. या चौकातील दोन्ही दिवशीचा आवाज धोक्‍याची पातळी ओलांडणारा ९२.५ डेसिबल इतका होता.

ध्वनिप्रदुषणाबाबत जनजागृती वाढत आहे. त्यामुळे चौकाचौकात आवाजाची पातळी कमी होत आहे. पण आवाजाची साधारण पातळी दिवसाला ६५ आणि रात्री ५५ डेसिबल इतकी असते. या वर्षी सुमारे दोन डेसिबलने आवाज कमी झाला. ही फार मोठी घट नाही. आवाजाची पातळी आणखी कमी व्हायला हवी.
- डॉ. महेश शिंदीकर, प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी