गणेशोत्सवामुळे सोसायट्यांमध्ये वाढतोय एकोपा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे केले पाहिजेत. त्यातून एकोपा वाढतो आणि एकमेकांशी असलेले ऋणानुबंध दृढ होतात. हाच आनंद आणि उत्साह आपण गणेशोत्सवतही जपायला हवा. आज सोसायट्यांमधील लहान मुले आणि तरुण एकत्र येऊन गणेशोत्सवाची सजावट करतात. हे पाहून आनंद वाटतो. येणाऱ्या काळातही हा वारसा टिकून राहील याचा विश्‍वास जागा होतो. 
-मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री  

पुणे - गणरायाचा जयघोष करणारी लहान मुले...आरतीत सहभागी झालेल्या सोसायटीतील महिला...अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पांमध्ये रमलेल्या युवती आणि मृण्मयी यांच्यासमवेत सेल्फी घेणारे ज्येष्ठ नागरिक असे काहीसे वेगळे वातावरण सोमवारी नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये रंगले होते. ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मृण्मयी यांनी सोसायट्यांमधील देखाव्यांची पाहणी केली अन्‌ सोसायट्यांनी केलेल्या देखण्या सजावटीला मनमुराद दादही दिली. या उत्सवामुळे सोसायट्यांमधील एकोपा वाढतो, असे मृण्मयी यांनी सांगितले. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘सकाळ’ने सोसायटी गणपती स्पर्धा आयोजिली होती. त्याअंतर्गत नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये कार्यक्रम झाले. मृण्मयी देशपांडे यांनी सोसायटीमधील सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती घेतली. स्पर्धेच्या तिन्ही दिवशी मृण्मयी यांनी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन देखाव्यांची पाहणी केली आणि दिलखुलास दादही दिली. सोसायट्यांकडून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मृण्मयी यांना 

सोसायट्यांमध्ये जाऊन बाप्पाच्या आरतीचे निमित्तही साधता आले. संतोष साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’ हे उपक्रमाचे प्रायोजक होते. तर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ हे उपक्रमाचे सहप्रायोजक होते.

स्प्रिंग मिडोज सोसायटी (नऱ्हे)
या वर्षी सोसायटीने सुंदर असा काल्पनिक मंदिराचा देखावा साकारला आहे. हा देखावाही मृण्मयी यांना आवडला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीने जपलेल्या एकोप्याने आणि सामाजिक उपक्रमांचे मृण्मयी यांनी कौतुक केले. बाप्पाची आरती केल्यानंतर त्यांनी सोसायटीतील लहान मुलांशी आणि तरुणांशी संवाद साधला. तसेच त्यांच्यासमवेत सेल्फीही काढले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे विभागीय व्यवस्थापक विजय वाघ, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या धायरी शाखेचे व्यवस्थापक किरण येनपुरे, लक्ष्मण मोरे आणि सोसायटीचे अमित या वेळी उपस्थित होते.

ऑक्‍सिजन व्हॅली (नऱ्हे)
या सोसायटीने यंदा साधेपणावर भर दिला असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीने अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजिले आहेत. मृण्मयी यांनी सोसायटीने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेत रहिवाशांना असेच उपक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच लहान मुलांना स्वाक्षरी देत त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी’चे संतोष म्हेत्रे, रितेश सिंग आणि सोसायटीचे कल्याण अवताडे या वेळी उपस्थित होते.