उत्सवातून घडते अनेकतेतून एकतेचे दर्शन : डॉ. धेंडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुणे : ''भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानामुळेच देशात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. त्याव्दारेच तर बंधूभाव वाढीस लागतो. कारण संविधानाने आपल्याला 'अनेकतेत एकता' हाच तर संदेश दिला आहे. सर्वधर्मियांच्या सामुहिक आरतीतून त्याचे दर्शन घडते,'' असे मत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले. 

साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर तर्फे शनिवारी (ता.2) विविध धर्मिय नागरिकांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. मुसलमानांचा शिरखुर्मा, बौद्धांची खीर, हिंदूचा मोदक, शीखांचा कडाप्रशाद, जैनांचा बत्तासा, ख्रिश्‍चनांच्या केकचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्या वेळी डॉ.धेंडे बोलत होते. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, जयसिंगराव कांबळे (बौद्ध), रेव्हरंड सुशिलकुमार खिलारे, रेव्हरंड सुरेंद्र लोंढे(ख्रिश्‍चन), हिरालाल छाजेड (जैन), मसुमअली सय्यद (मुस्लिम), भोलासिंग आरोरा (शीख) उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राजवैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. 

सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी गणेशोत्सव, ईद, नाताळ, महावीर जयंती अशा विविध धर्मियांच्या महत्त्वपूर्ण सणांचे औचित्य साधून नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरतर्फे करण्यात येते. माळवदकर म्हणाले,''स्वराज्य मिळाले. परंतु सुराज्याच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांचे योगदान महत्वाचे आहे. गणेशोत्सवातून अठरापगड जाती, अन्य धर्मिय नागरिक एकत्र येतात. त्यामुळे राष्ट्रीय सलोख्याचे दर्शन घडते.''