गौरींचे आज आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुखवटे, दागदागिने खरेदीसाठी गर्दी
पुणे - सोन्या-मोत्याच्या पावलाने गौर आली गौर... ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अर्थातच महालक्ष्मींचे उद्या (ता. 29) आगमन होत आहे. यानिमित्ताने भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर महिलावर्गाने गौरींचे मुखवटे आणि दागदागिने, सजावट साहित्य, तसेच तयार खाद्यपदार्थ खरेदीचा आनंद घेतला.

मुखवटे, दागदागिने खरेदीसाठी गर्दी
पुणे - सोन्या-मोत्याच्या पावलाने गौर आली गौर... ज्येष्ठा, कनिष्ठा गौरी अर्थातच महालक्ष्मींचे उद्या (ता. 29) आगमन होत आहे. यानिमित्ताने भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावर महिलावर्गाने गौरींचे मुखवटे आणि दागदागिने, सजावट साहित्य, तसेच तयार खाद्यपदार्थ खरेदीचा आनंद घेतला.

महात्मा फुले मंडई, तुळशीबाग परिसर महिलावर्गाच्या गर्दीने फुलून गेला होता. पावसाचे तुषार अंगावर झेलत भाविक गौरींसंबंधी विविध साहित्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. सोन्या-चांदीच्या पेढ्यांवरही गौरींसाठी दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची विशेष उपस्थिती जाणवत होती. गौरीला मणी-मंगळसूत्र, मुकुट, हार यांसह खण-नारळाची ओटी आदी वस्त्रालंकारांसहित पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून, मुहूर्तावर गौरींना आवाहन करायचे म्हणून अनेकविध साहित्याची खरेदी करण्यात महिलावर्ग व्यग्र असल्याचेच पाहायला मिळाले.

शाडूपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) मुखवटे, लोखंडी व स्टीलच्या स्टॅन्डसह विविध तयार सेट्‌सही बाजारात आले आहेत. अगदी सहाशे रुपयांपासून गौरींचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. याबाबत विक्रेते गिरीश पटवर्धन म्हणाले, 'पूर्वी शाडूच्या मुखवट्यांना अधिक मागणी असे. मात्र, आता पीओपीच्या मुखवट्यांना महिला प्राधान्य देतात. कारण हे मुखवटे हाताळायला सोपे असतात. तयार स्टीलचे स्टॅन्ड बाजारात आले असून, त्यामध्ये धान्य भरण्याचीही व्यवस्था आहे. सणवार म्हटले की उत्साहाने विविध प्रकारचे साहित्य महिला आवर्जून खरेदी करतात.

'भाद्रपद शुद्ध अष्टमीला म्हणजे उद्या (ता. 29) गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होत आहे. अनुराधा नक्षत्र संपूर्ण दिवसभर आहे, त्यामुळे दिवसभर केव्हाही घरोघरी गौरी बसविता येतील.

कुलाचाराप्रमाणे उभ्या व खड्यांच्या गौरींचे पूजन करण्याची प्रथा व परंपरा आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. गौरी बसविल्यावर त्यांना मेथीची भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नवमीला (ता. 30) गौरीपूजन व भोजनाचा दिवस आहे. या दिवशी सोळा प्रकारच्या भाज्या करण्याचीदेखील पद्धत असते. परंतु, सोयीनुसार शक्‍य तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवावा. दशमीला (ता. 31) दिवसभर मूळ नक्षत्र असून, केव्हाही गौरींचे विसर्जन करावे. दही-भात किंवा दही-पोह्याचा नैवेद्य दाखवावा, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळविले आहे.