दान मूर्तींचेही विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमध्ये महापालिकेची मधस्थी 

पिंपरी - वाहत्या पाण्यात विसर्जनाबाबत हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकही मूर्तिदान झाले नाही. महापालिकेने बजरंग दल आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक बोलावत यशस्वी मध्यस्थी केली. या बैठकीत मूर्तिदान घेतलेल्या मूर्तींचा विधिवत विसर्जनाचा सर्वमान्य तोडगा निघाल्याने सर्वांनी समाधान व्यक्‍त केले. मूर्तिदानाबाबत ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमध्ये महापालिकेची मधस्थी 

पिंपरी - वाहत्या पाण्यात विसर्जनाबाबत हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकही मूर्तिदान झाले नाही. महापालिकेने बजरंग दल आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक बोलावत यशस्वी मध्यस्थी केली. या बैठकीत मूर्तिदान घेतलेल्या मूर्तींचा विधिवत विसर्जनाचा सर्वमान्य तोडगा निघाल्याने सर्वांनी समाधान व्यक्‍त केले. मूर्तिदानाबाबत ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

वाहत्या पाण्यातच विसर्जन करा, अशी आग्रही भूमिका बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. याबाबत सोशल मीडियावरील पोस्टमुळे मतभेद वाढत गेले. चिंचवड पोलिसांनीही संस्कार प्रतिष्ठान यांना मूर्तिदान न घेण्याबाबत सूचना केल्या. मूर्तिदान ऐच्छिक असल्याचे सांगत महापौर नितीन काळजे यांनीही याकडे दुर्लक्ष केले.  

याबाबत महापालिका भवनात आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुरुवारी (ता. ३१) झालेल्या बैठकीस बजरंग दलाचे कुणाल साठे, मंगेश नढे, शार्दूल पेंढारकर, निखिल भालके, संजय शेळके, पर्यावरण प्रेमी हेमंत गवंडे, नीलेश मरळ, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, प्रा. मारुती शेलार, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत उपस्थित होते.

मूर्तिदानाबाबत हिंदुत्ववादी संघटना आणि पर्यावरणप्रेमी यांच्या भूमिका ‘सकाळ’ने सविस्तर मांडल्या. मात्र, पर्यावरणाच्या नावाखाली दान घेतलेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन होत नाही, असे बजरंग दलाचे म्हणणे होते. आमचा पर्यावरणपूरक उपक्रमाला विरोध नाही. मात्र, दान घेतलेल्या मूर्तीचे विधिवत विसर्जन व्हावे, अशी आमची मागणी असून आम्ही त्याबाबत तडजोड करणार नसल्याचे बजरंग दलाने सांगितले; तर दुसरीकडे दान घेतलेल्या मूर्तीचे आम्ही विधिवत विसर्जन करतो, अशी भूमिका संस्कार प्रतिष्ठानने मांडली. त्यावर आयुक्‍त हर्डीकर यांनी दान घेतलेल्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते सोबत द्या, त्यांच्या सांगण्यानुसार विधिवत विसर्जन करू, असा तोडगा आयुक्‍तांनी दिला. त्यावर बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना यांचे एकमत झाले.

पालिका करणार जागृती
पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी महापालिकेने आग्रही भूमिका घ्यावी, असे मत पर्यावरणप्रेमी संघटना आणि बजरंग दल यांनी व्यक्त केले. त्यावर महापालिकेतर्फे गणेशोत्सवापूर्वी याबाबत जनजागृती केली जाईल, असे आश्‍वासन आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पोलिसांची उपक्रमाला हरकत
महापालिकेच्या मध्यस्थीनंतर थेरगाव घाटावर बुधवारी (ता.३१) दुपारी चार वाजता मूर्तिदान उपक्रम सहा दिवसांनंतर पुन्हा सुरू झाला. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी या उपक्रमाला हरकत घेतल्याने पुन्हा तो बंद झाला. ‘वाहत्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन करा’, असे आवाहन करणारे फलक हाती घेऊन हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ते घाटावर उभे होते. पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी मूर्तिदान घेणाऱ्या संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही बाहेर काढा, अशी भूमिका घेतली. यामुळे पोलिसांनी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून घाटाबाहेर जाण्यास सांगितले. महापालिकेनेच मूर्तिदान घेण्यास सांगितल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लेखी पत्राची मागणी केली. त्यानंतर संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी याबाबत पालिका आयुक्‍तांना कळविले. ‘आपण याबाबत पोलिस उपायुक्‍तांशी बोलतो’, असे आश्‍वासन आयुक्‍तांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र, काही काळानंतर पुन्हा मूर्तिदान उपक्रम जोमाने सुरू झाला. 

भक्‍तांकडून मूर्तिदान सुरूच
मूर्तिदान सुरू केल्यावर तासाभरात १०० मूर्ती दान करण्यात आल्या. पोलिसांच्या सूचनेनंतर मूर्तिदान घेण्याचे संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बंद केले. त्यानंतरही नागरिक स्वतःहून आपल्या मूर्ती दान केलेल्या मूर्तीशेजारी ठेवत होते.

Web Title: pimpri pune news donate ganesh murti visarjan