गणेशोत्सवातून सामाजिक जाणीव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे - ‘ओला-सुका कचरा जिरवा’, ‘शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवा’, ‘वाहतुकीचे नियम पाळा’, ‘इको फ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करा’,... शाळांमधील विद्यार्थी सध्या मोठ्या उत्साहात आहेत आणि आपल्या शाळेतल्या बाप्पाची पूजा-आरती करण्याबरोबरच अशा संदेशांचाही प्रसार करीत आहेत...

शहरातील शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे - ‘ओला-सुका कचरा जिरवा’, ‘शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवा’, ‘वाहतुकीचे नियम पाळा’, ‘इको फ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करा’,... शाळांमधील विद्यार्थी सध्या मोठ्या उत्साहात आहेत आणि आपल्या शाळेतल्या बाप्पाची पूजा-आरती करण्याबरोबरच अशा संदेशांचाही प्रसार करीत आहेत...

प्रतिष्ठापना व विसर्जनाची मिरवणूक या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. बाप्पाला खिरापत, दररोजची पूजा व अथर्वशीर्षाचे पठण या माध्यमातून बालवयातच मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी शाळांमध्ये सध्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचा उपक्रम अनेक शाळांमध्ये घेण्यात आला, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोदक कसा तयार करावा व सजावट कशी करावी, याचेही प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना सामाजिक विषयांची जाणीव निर्माण होण्यासाठी व्याख्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

म. ए. सो. मुलांचे विद्यालयामध्ये (भावे हायस्कूल) यंदा ‘पुण्याची वाहतूक’ या विषयावरील प्रदर्शन भरविले आहे. यात वाहतुकीच्या नियमांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘इको फ्रेंडली’ गणपती आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापन या विषयावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहतुकीसंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अनिल पंतोजी यांचे व्याख्यानाचेही आयोजन केले होते. याच विषयावर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पथनाट्याद्वारे प्रबोधन करत आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, कांता 
इस्टे,भारती तांबे व शिक्षकांनी केले आहे. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलच्या पर्यवेक्षिका विजयमाला घुमे म्हणाल्या,‘‘कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, ओला-सुका कचरा कसा जिरवावा, याबाबत विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केले जात आहे. निर्माल्याचे निर्माल्याचे विघटन कसे करावे, यासंदर्भातही त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.’’ 

विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता काजरेकर म्हणाल्या,‘‘शाळेत पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्त मुलांकडून स्वच्छतेची प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. तसेच विज्ञानविषयक प्रश्‍नमंजूषा स्पर्धाही घेण्यात आली. इयत्ता अकरावी, बारावीचे विद्यार्थ्यांनी पथनाट्य बसविले असून, त्याद्वारे ते सामाजिक समस्येबाबत जनजागृती करत आहेत.’’