जिल्ह्यातील 13 दगडखाणी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. सुयोग जगताप म्हणाले,""जिल्हा प्रशासनाकडून दगडखाणींना परवानगी देताना नियम व अटींचे पालन करण्याचे लेखी आश्‍वासन आम्ही घेत असतो.

पुणे : पर्यावरणाचे नियम भंग करून केली जाणारी बेसुमार टेकडीफोड आणि प्रदूषण याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची दखल घेत जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांतील 13 दगडखाणी बंद करण्याचा आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने दिला आहे.

""हवेली, मुळशी, भोर तालुक्‍यातील ग्रामस्थांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. दगडखाणींची परवानगी देताना पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची ताकीद संबंधित ठेकेदारांना दिली होती; परंतु, त्यामध्ये हयगय केली जात असून, बेसुमार टेकडीफोड, वाहतुकीदरम्यान रस्त्यांचे नुकसान करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई केली,'' अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. सुयोग जगताप म्हणाले,""जिल्हा प्रशासनाकडून दगडखाणींना परवानगी देताना नियम व अटींचे पालन करण्याचे लेखी आश्‍वासन आम्ही घेत असतो. त्याद्वारे काम केले जात आहे किंवा नाही, हे तहसीलदार स्तरावर पाहणी केली जाते; परंतु काही ठिकाणी दगडखाण चालकांकडून अक्षम्य चुका होत असल्याचे निदर्शनास आले. त्या विरोधात ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन ही कारवाई केली आहे.''

नियम धाब्यावर
कोणतेही खाणकाम करण्यापूर्वी एकूण क्षेत्रफळाच्या 33 टक्के वनीकरण करणे बंधनकारक आहे. चारही बाजूला वनीकरण करून दगडखाण खोदाई करणे बंधनकारक असताना हा नियम पाळला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. जिल्हा प्रशासनाकडे स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामसभेतील ठरावांच्या प्रती सादर करून खाणी बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कारवाई केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.