लोहगाव विमानतळासाठी आणखी १८ एकर जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

पुणे - लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त अठरा एकर जागा उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीला पर्रीकर, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे सदस्य एस. रहेजा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पर्रीकर यांनी अतिरिक्त जागा देण्यास तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.

लोहगाव विमानतळाजवळ वेकफिल्ड चौक आहे. या चौकाच्या वरील बाजूस विमानतळास लागून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची २७ एकर जागा आहे. त्यापैकी काही जागेवर डेपो आहे. तर काही जागेवर शेड्‌स, गाड्या आणि इमारती आहेत. त्या जागेचा वापर होत नाही. त्यापैकी अठरा एकर जागा विस्तारीकरणासाठी मिळावी, असा प्रस्ताव पुढे आला होता. ही जागा मिळण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि इंडियन एअर फोर्स यांच्यात करार झाला, तर विमानतळाचे विस्तारीकरण शक्‍य होईल. तसेच या अतिरिक्त जागेवर हॅंगर, टर्मिनल आणि पार्किंगची उभारणी शक्‍य होईल, असे या प्रस्तावात मांडले होते. त्यास मंजुरी मिळाल्याने ही जागा विस्तारीकरणासाठी ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

त्याचबरोबरच विमानतळाच्या परिसरातील रस्ते, पाणी यासह इतर आवश्‍यक बाबींवरही या बैठकीत चर्चा झाली. विमानतळ प्राधिकरणाला दिल्या जाणाऱ्या जागेतून हवाई दलाची डेटा केबल जाते. ती डेटा केबल हलविणे, सीमा भिंत बांधणे आदी कामांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे बापट यांनी सांगितले.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वी एअरफोर्सकडून पंधरा एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. गेल्या वर्षात ही जागा एअरफोर्सकडून एअरपोर्ट ॲथोरिटीकडे हस्तांतरही करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत
 होणार आहे.

Web Title: 18 acer place for lohgav airport