खंडणीची रोकड लंपास करणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे : खासगी कंपनीच्या सरव्यवस्थापकासह त्यांच्या ड्राइव्हरच्या अपहरण प्रकरणात खंडणीखोरांकडुनच खंडणीची 2 लाख 40 हजार रूपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. 

पुणे : खासगी कंपनीच्या सरव्यवस्थापकासह त्यांच्या ड्राइव्हरच्या अपहरण प्रकरणात खंडणीखोरांकडुनच खंडणीची 2 लाख 40 हजार रूपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. 

अशोक जकप्पा मसाळ व सुरेश सोमलिंग बनसोडे अशी निलंबन करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. दोघेही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याप्रकरणी राहुल मनोहर कटमवार यांनी वानवडी पोलिस ठाण्यात अपहरणप्रकरणी फिर्याद दिली होती. कटमवार हे बी.टी.कवडे रस्त्यावरील एका खासगी कंपनीमध्ये सरव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. मागील आठवड्यात ते काम संपवून घरी येत असताना चार अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवुन त्यांचे अपहरण केले होते. 

अपहरण करणाऱ्यांनी मागितलेली खंडणी देण्यासाठी त्यांनी कुटुंबासह नातेवाईक व कार्यालयातील सहकाऱ्यांकडुन 14 लाख 40 हजार रुपये रक्कम ड्रायव्हर मार्फत मागविली होती. दरम्यान अपहरण करणाऱ्यांनी त्यांना कात्रज येथे आणले. तेथे थांबले असताना त्यांना रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या मसाळ व बनसोडे यांनी हटकले. दरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केली, त्यावेळी त्यांना पैशाची बॅग आढळली. त्याबाबत विचारणा केल्यानंतर अपहरण करणाऱ्यांनी ते जमीनीचे पैसे असल्याचे सांगून त्यापैकी 2 लाख 40 हजार रूपयांची एक बॅग पोलिसांच्या हाती दिली. हे अपहरण नाट्य ओळखण्याऐवजी पोलिसांनी पैशाची बॅग घेऊन तेथुन काढता पाया घेतला.

दरम्यान, कटमवार यांनी फिर्यादींमध्ये चार जणांसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचीही नावे घेतली होती. त्यावरुन परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी मसाळ व बनसोडे या दोघाविरुद्ध निलंबनाची कारवाईचे आदेश दिले. दरम्यान याबाबतचा आदेश निघाला आहे, मात्र अद्याप पोलिस ठाण्याला प्राप्त झालेला नसल्याचे भारती पोलिस ठाण्याचे पोलिस पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी स्पष्ट केले.

Web Title: 2 police suspended for extortion in pune

टॅग्स