चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला गती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

पुणे - नियोजित चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून येत्या दोन दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्‍यता असून, त्यानंतर येत्या 25 जूनला नव्याने जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यापाठोपाठ मीटर (व्यावसायिक) बसविण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे या योजनेला गती येणार आहे.

पुणेकरांना शुद्ध व समान पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 3 हजार 330 कोटी रुपयांची ही योजना आखण्यात आली असून, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 हजार 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून, सुमारे 2 हजार 264 कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याच्या ठरावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. त्यातच कर्जरोखे घेण्यासाठी "हुडको'ने 15 जूनची मुदत दिल्याने पुढील चार दिवसांत राज्य सरकारची मंजुरी घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिकेने राज्याच्या नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. कर्जरोखे घेण्याची प्रक्रिया मुदतीत करण्यात येणार असल्याने राज्य सरकारची तातडीने मंजुरी घेण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ही मंजुरी मिळताच, जलवाहिन्या आणि मीटरच्या कामासाठी काढलेल्या निविदा उघडण्यात येणार असून, त्यानुसार लगेचच कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येणार आहे. त्यानंतर 25 जूनला योजनेचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी' योजनेच्या घोषणेचा मुहूर्त साधून, 25 जूनला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरवात करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, ""या योजनेत पाण्याच्या टाक्‍यांनंतर जलवाहिन्या आणि मीटरची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्या उघडल्यानंतर कामाचा आदेश दिला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.''