घराची भिंत कोसळून आठ जखमी

केशवनगर - कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पोकलेन मशिनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला.
केशवनगर - कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पोकलेन मशिनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला.

मुंढवा - ओढ्याच्या कडेला असलेल्या दुमजली घराची भिंत कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास केशवनगर परिसरात घडली. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घराजवळील गोठ्यातील तीन म्हशींचा यात मृत्यू झाला, तर काही गाई-म्हशींना बाहेर काढण्यात यश आले आहे.

कैलास सुभाष भांडवलकर (वय ६०), छाया भांडवलकर (वय २२), अरुणा भांडवलकर (वय ४०), मुग्धा भांडवलकर (वय १), साक्षी शिखतल (वय १२), स्वरा शिखतल (वय ३), आदित्य मौर्य (वय ५), वनिता रामसूरज मौर्य (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत. 

केशवनगरमध्ये सुभाष भांडवलकर यांच्या मालकीचे १५ वर्षांपूर्वीचे दुमजली घर आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक या घराची पाठीमागील भिंत कोसळली. त्या वेळी भांडवलकर यांचे कुटुंब, त्यांचे भाडेकरू मौर्य व शिखतल यांची मुलेही घरी होती. आठ जण या भिंतीखाली अडकले. 
या घटनेनंतर अग्निशामक दल, पोलिस, स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. रस्ता मोठा नसल्याने बचाव कार्यामध्ये अडचणी येत होत्या. मात्र त्यानंतरही बचाव पथकाने आठही जणांना सुखरूप बाहेर काढले. 

या दुर्घटनेत भांडवलकर यांच्या कुटुंबीयांसह भाडेकरूही जखमी झाले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होते. घराखाली गोठा असल्याने काही गाई-म्हशीही त्यामध्ये अडकल्या होत्या. 

बचाव पथकाने त्यापैकी दोन गाई व दोन म्हशींना बाहेर काढले. मात्र तीन म्हशींचा यात मृत्यू झाला. दोन जेसीबी व एका पोकलेनच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उपसून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com