लोकल चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला

संदीप घिसे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच त्यानंतर येणारी सिंहगड एक्‍सप्रेस, पनवेल गाडी आणि त्यानंतरची लोकल थांबविण्यात आली. तडे गेलेला रेल्वेरूळ बदलण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे; एक तास वाहतूक विस्कळीत

पिंपरी : रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लोकल चालकाच्या लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत त्यांनी ही माहिती आकुर्डी रेल्वे स्थानकाला कळविल्यामुळे संभाव्य अपघात टळला. आज (मंगळवारी) पहाटे घडलेल्या या घटनेमुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली.

पुण्याहून लोणावळ्याकडे जाणारी रेल्वे लोकल सकाळी 5.58 वाजता चिंचवड रेल्वे स्थानकाहून आकुर्डीच्या दिशेने रवाना झाली. चिंचवड ते आकुर्डी दरम्यान बिजलीनगरजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लोकल चालकाच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत आकुर्डी रेल्वे स्थानकवर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती चिंचवड स्थानक येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली.
रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच त्यानंतर येणारी सिंहगड एक्‍सप्रेस, पनवेल गाडी आणि त्यानंतरची लोकल थांबविण्यात आली. तडे गेलेला रेल्वेरूळ बदलण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर सकाळी सात वाजता रेल्वे वाहतूक सुरू झाली. मात्र त्यानंतरच्या रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा फटका चाकरमान्यांना बसला.

रेल्वेरुळ दुरूस्त होण्यासाठी वेळ लागेल असे प्रवाशांना वाटल्याने अनेकांनी पुणे मुंबई महामार्गावर येऊन खासगी वाहनांनी मुंबईचा रस्ता धरला. यामुळे खासगी वाहन चालकांनी लगेच भाड्यात वाढ केल्याचेही काही प्रवाशांनी सांगितले. 
चिंचवड रेल्वे स्थानकानजीक मुंबईच्या दिशेने असणाऱ्या दळवी नगर झोपडपट्टी येथे रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. हे तडे मुंबईकडे जाणारी अपलाईनवर गेले आहेत. यामुळे रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू असून दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, लोणावळ्याजवळ तळेगाव ते देहूरोड स्थानकांदरम्यान बेगडेवाडी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या एका मालगाडीचे असलेल्या येथे ब्रेक फेल झाले आहेत. त्यामुळे ही मालगाडी जागेवरच थांबून आहे. त्यामुळे आता मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल व एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत.
 

Web Title: accident avoided as local train driver shows presence of mind