चैतन्यपर्वात कृषीसंपन्नतेचा संकल्प!

चैतन्यपर्वात कृषीसंपन्नतेचा संकल्प!

पुणे - बुद्धीची देवता श्री गणेश, विघ्नहर्ता विघ्नेश्‍वर, मंगलमूर्ती मोरया. ओंकारस्वरूप गणनायक. अर्थातच, गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा. लाडक्‍या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमय सोहळ्याचा प्रारंभ भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून (ता. 5) होत आहे. वरुणराजानेही यंदा कृपादृष्टी दर्शविल्याने, यंदाच्या उत्सवात या चैतन्यपर्वाला सुरवात होत असून, सकारात्मक आणि विधायक कार्याचा प्रारंभही करण्याचा संकल्पही या निमित्ताने गणेशभक्तांनी केला आहे. 

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती बाप्पा मोरया. एकदंत, गजकर्ण, लंबोदराचा उत्सव एक आनंददायक पर्वणीच होय. शुभकार्याचा मुहूर्तही श्री गणेश. संकल्पपूर्तीची प्रेरणाही श्री गणेश. मांगल्याचे प्रतीकही श्री गणेश. कृषीदेवताही श्री गणेश. दूष्टप्रवृत्तांचा संहारकही श्री गणेश. सृजनांची सर्जकशक्ती श्री गणेश. सत्शीलांचा अभयदाता श्री गणेश. चांगल्या विचारांचा जन्मदाताही श्री गणेश. दोष, उणिवा, अपयश पचवून सांघिक शक्तीचे यश मिळवून देणारा गणनायक. कोणासही मोद अर्थात आनंद देणारा मोदकप्रीयदेखील श्री गणेश. निसर्गदेवताही श्री गणेश. बाप्पाची मूर्तीही मातीची अथवा शाडूमातीची प्रतिष्ठापित करून आपणही करूयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव. ब्राह्ममूहूर्तापासून दुपारी दीडपर्यंत "श्रीं‘ची प्रतिष्ठापना करून आजच करूया पर्यावरणरक्षणाचा संकल्प. आपल्या संकल्पपूर्तीसाठी तृतियेचा मूहूर्त साधत भाविकांनी "श्रीं‘ची मूर्ती घरी आणली. 

समाजोन्नतीचा विडा गणेशाच्या साक्षीने उचलणारी राजकीय, सामाजिक मंडळी अन्‌ भाविकदेखील उत्साहाने साजरा करतात तो आनंदोत्सव म्हणजेच गणेशोत्सव होय. धार्मिक असो सांस्कृतिक कार्यक्रम असोत, कलाकारांना त्यांची कलाही सादर करण्याची संधी मिळते तेही कलेची देवता गणपतीच्या बाप्पाच्या उत्सवात. या उत्सवाच्या प्रारंभापासूनच दहा दिवसांच्या उल्हासित वातावरणापासूनच आपण संकल्प करूयात विधायक कार्याचा अन्‌ राज्याची उन्नती, उत्कर्ष, विकासाचा. सुजलाम्‌ सुफलाम्‌ कृषीसंपन्न राज्याचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com