आळंदीत शुक्रवारपासून अवजड वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आळंदी - कार्तिकी वारीसाठी शुक्रवारपासून (ता. १०) आळंदीत अवजड आणि चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे-आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली-लोणीकंदमार्गे वळविली जाणार आहे. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी राहणार असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

आळंदी - कार्तिकी वारीसाठी शुक्रवारपासून (ता. १०) आळंदीत अवजड आणि चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे-आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली-लोणीकंदमार्गे वळविली जाणार आहे. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी राहणार असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

दोन पोलिस उपविभागीय अधिकारी, पंधरा पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक, सहाशे पोलिस आणि पाचशे होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त कार्तिकी वारी काळात राहणार आहे. इंद्रायणी नदी परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरा, चाकण चौकात भुरट्या चोऱ्या आणि पाकिटमारीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. वारी काळात दोन सत्रांत पोलिसांचा बंदोबस्त राहील. मंदिर आणि मंदिर परिसरात शंभर पोलिसांचा बंदोबस्त, तर महाद्वार, पंखा मंडपात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. 

इंद्रायणी काठी आणि शहरातील प्रमुख चौकांत संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शहरात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी बत्तीस कॅमेरे बसविण्यात आले आहेत. केळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सहा कॅमेरे लावले आहेत. मंदिराच्या पानदरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. दर्शन झाल्यानंतर महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. महाद्वारातून केवळ पोलिस, महसूल कर्मचारी, देवस्थानचे मानकरी, पुजारी, सेवक, पत्रकार अशा पासधारकांनाच प्रवेश दिला जाईल. हरिहरेंद्र स्वामी मठाशेजारील दरवाजातून फडकरी, दिंडीकरी आणि निमंत्रित पासधारकांना प्रवेश दिला जाईल. हनुमान दरवाजातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील रस्ता दुरुस्ती, अखंडित वीजपुरवठ्यासाठी दोन्ही विभागांशी पत्रव्यवहार केला आहे. शहराबाहेर चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सुविधा पुरविणारी वाहने, रुग्णवाहिका, दूधविक्रेत्यांची वाहने शहरात सोडली जातील. शुक्रवारी (ता. १०) पोलिसांचा बंदोबस्त रुजू होईल.

पीएमपी बस चऱ्होली फाट्यापर्यंत
पुणे शहर पोलिसांच्या वतीने दिघी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक खैरे यांनी सांगितले, की शहर पोलिसांच्या वतीने वारीसाठी सहा पोलिस निरीक्षक, ४५ फौजदार आणि सहायक पोलिस निरीक्षक, चारशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारी काळात पुण्याहून आळंदीला येणारी वाहने थेट आळंदीत न सोडता देहूफाट्यावरून मोशीमार्गे वळविण्यात येणार आहेत. एसटी गाड्या देहूफाट्यावर बस स्थानकापर्यंत सोडल्या जातील; मात्र पीएमपीच्या गाड्यांसाठी चऱ्होली फाटा येथे उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Web Title: Alandi ban heavy vehicles