सर्व कॅंटोन्मेंटमध्ये लोकोपयोगी प्रकल्प व्हावेत - जोजनेश्‍वर शर्मा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - 'पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्यास पुढाकार घेतला. बोर्ड सातत्याने अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवीत असते. "स्मार्ट कॅंटोन्मेंट'मध्येही पुणे कॅंटोन्मेंटने आघाडी घेतली आहे. या कॅंटोन्मेंट प्रमाणेच अन्य कॅंटोन्मेंटनेही लोकोपयोगी उपक्रम व प्रकल्प राबवावेत,'' असे मत लष्कराच्या मालमत्ता विभागाचे महासंचालक जोजनेश्‍वर शर्मा यांनी शनिवारी व्यक्त केले.

कॅंटोन्मेंट बोर्डातर्फे बाबाजान दर्ग्याजवळील कॅंटोन्मेंटच्या जागेत महिला वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन शर्मा यांच्या हस्ते झाले. या वेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, दक्षिण मुख्यालयाच्या मालमत्ता विभागाच्या मुख्य संचालक गीता परती, संचालक भास्कर रेड्डी, के. जे. एस. चौहान, मालमत्ता विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. डी. एन. यादव, खडकीचे "सीईओ' अमोल जगताप, देहूरोड कॅंटोन्मेंटचे "सीईओ' अभिजित सानप, नगर कॅंटोन्मेंटचे "सीईओ' विनीत रोडे, बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, विवेक यादव, डॉ. किरण मंत्री, प्रियांका श्रीगिरी, रूपाली बिडकर उपस्थित होत्या.

शर्मा म्हणाले, 'ग्रामीण भागातून येऊन शहरात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. अशा महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच केंद्र सरकारने महिला वसतिगृहाचा प्रकल्प आणला. वसतिगृह बांधल्यानंतर महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी कॅंटोन्मेंटची आहे.''

परती म्हणाल्या, 'नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने हे वसतिगृह महिलांसाठी महत्त्वपूर्ण असेल.''
ब्रिगेडिअर त्यागी यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील कार्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, ""आपल्या कारकिर्दीत 14 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्पांना आर्थिक मंजुरी मिळाली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला मालमत्ता विभागाने मंजुरी द्यावी.''

स्वार्थासाठी चुकीच्या बातम्या - त्यागी
कॅंटोन्मेंटमधील रस्ते बंद असलेले रस्ते सुरू करण्याबाबत एका सदस्याने आपल्या भाषणात सांगितले. या आरोपाचा समाचार घेत ब्रिगेडिअर त्यागी म्हणाले,""कुठलेही रस्ते बंद केलेले नाहीत. केवळ दुरूस्तीसाठी एक रस्ता बंद ठेवला होता. मात्र काहींनी स्वार्थासाठी चुकीच्या बातम्या पसरविल्या. या संदर्भात संबंधित सदस्य किंवा प्रसारमाध्यमांनीही मला विचारले नाही. कामात पारदर्शकता पाहिजे,'' अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच अध्यक्ष म्हणून कदाचित हा आपला शेवटचा कार्यक्रम असेल, असे सांगत बदलीचे सूतोवाचही केले.

Web Title: All cantonment be in public utility projects