आंबेडकर भवनाच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही - महापौर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता पडणार नाही; तसेच भवनातील ग्रंथसंपदेची निगा राखली जाईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता पडणार नाही; तसेच भवनातील ग्रंथसंपदेची निगा राखली जाईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

आंबेडकर भवनातील दुरुस्तीचे काम रखडले असून, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल "सकाळ'ने नुकतेच सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) याबाबत आंदोलनही केले होते. त्याची दखल घेत महापौरांनी बुधवारी स्मारकात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाला अचानक भेट दिली. तेथील अभ्यासिका आणि संग्रहालयाची उभारणी चांगल्या पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संग्रहालयातील ग्रंथसंपदा आणि 

दुर्मिळ वस्तूंचे जतन करण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करणार आहे. स्मारकासाठी या पूर्वी 70 लाख आणि यंदा 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणखी निधी लागला तरी तो उपलब्ध करून दिला जाणार आहे. आगामी दोन-चार महिन्यांत स्मारकातील दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वच्छतागृहांची निगा राखण्याचीही सूचना त्यांनी या वेळी केली. 

महापौरांच्या भेटीपूर्वी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका पल्लवी जावळे यांनीही भेट दिली. येथील ग्रंथालयात नियमितपणे पुस्तक खरेदी करावी, संविधान आणि ऍट्रॉसिटी जागरूकतेबद्दल कार्यक्रमांचे आयोजन करावे आदी मागण्या नॅशनल जस्टिस फोरमचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी महापौरांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.