बाणेर अपघातातील मृतांची संख्या दोनवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

यावर उपाय काय?

या निमित्ताने तुमच्या मनात पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय शोधण्यासाठी काही सूचना, कल्पना आहेत का? कसे लावता येईल वाहनचालकांना शिस्त? कसा करता येईल पादचाऱ्यांचा सन्मान? शिक्षेच्या पलिकडे जाऊन नियम न पाळण्याची मानसिकता बदलण्यासाठी काय करता येईल? कळू द्या जगाला. 

प्रतिक्रियांमध्ये तुमचे मत नोंदवा.

किंवा सविस्तर अनुभव ईमेल करा- webeditor@esakal.com

(ईमेलच्या 'Subject' मध्ये लिहा- Accidental)

एकजण अत्यवस्थ; सर्वजण उत्तर प्रदेशमधील रहिवासी

पुणे/ औंध: बाणेर परिसरात भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इशिकाची (वय 3) आई पूजा अजयकुमार विश्‍वकर्मा (वय 25) हिचाही रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, साहिल शाहिद शेख (वय 4) हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी मोटार चालक महिलेला मंगळवारी अटक केली.

निशा शाहिद शेख (वय 27) आणि तिचा भाऊ सय्यद अली (वय 25) हे जखमी असून, त्यांच्यावर मेडीपॉइंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयकुमार विश्‍वकर्मा गेल्या 10 वर्षांपासून बाणेर येथे राहतात. ते येथील चिंतामणी ट्रेडर्स या फॅब्रिकेशनच्या दुकानात कामाला आहेत. तर, निशाचे पती शाहिद शेख हे बाणेर येथील अहनफ कार केअर येथे एसी मेकॅनिक आहेत. या अपघातात जखमी झालेला निशाचा भाऊ सय्यद अली हा बबलू सलून या केस कर्तनालयात कामाला आहे. विश्‍वकर्मा कुटुंबीय कुडवार जिल्हा सुलतानपूर (उत्तर प्रदेश) येथील आहे. शेख कुटुंबीयसुद्धा उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहेत.

विश्‍वकर्मा हे त्यांच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी मंगळवारी कुटुंबासह गावी जाणार होते. त्यासाठी एक महिन्यापूर्वी रेल्वे तिकीटही आरक्षित केले होते. गावी जाण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा शेजारी राहणाऱ्या निशा शाहिद शेख यांच्यासमवेत दुपारी खरेदीसाठी बाणेर येथील डीमार्ट येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इशिका, निशाचा भाऊ सय्यद अली आणि मुलगा साहिल हे सर्व एकत्र होते. खरेदी करून परतताना रस्ता ओलांडण्यासाठी सर्वजण रस्त्यातील दुभाजकाजवळ थांबले होते. त्यावेळी भरधाव मोटारीने थेट दुभाजकावर गाडी नेत पाचजणांना फरफटत नेले. या अपघातात मायलेकीच्या मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेला जबाबदार असलेल्या या महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही या ठिकाणी गतिरोधक बसविले नाहीत. रस्ता दुभाजकांची उंची वाढवण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतलेली नाही. याविरोधात बाणेरवासियांकडून निषेध व्यक्‍त करण्यात आला.


निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय 54, रा. डेक्‍कन जिमखाना) यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
- दयानंद ढोमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


व्हिडीओ गॅलरी