जाऊ शब्दांच्या गावा... चित्रांच्या मार्गाने

स्वप्निल जोगी
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - निरनिराळ्या आकारांची, रचनांची, मूर्त-अमूर्त शैलीतली चित्र आपण अनेकदा पाहतोच. त्यांतील रंग, त्यांचा पोत आपल्याला मनोमन भावतात देखील. पण सगळ्यांत जास्त जर काही मनाला जाऊन भिडत असेल तर, तो असतो चित्रांतील भाव !... अनेकदा तर विविध शब्दच चित्र बनून आपल्याशी बोलू लागतात, तेव्हा ते अधिक जवळचे वाटू लागतात. अशीच काही शब्दांची आगळीवेगळी चित्ररूपं अर्थात 'शब्दचित्र' पुणेकरांच्या भेटीला आली आहेत...

'शब्दांच्या गावा' नावाच्या एका चित्रप्रदर्शनातून ही शब्दचित्रांची अनोखी संकल्पना रसिकांना पाहता येत आहे. आपल्या मनातला एखादा शब्द हा किती निरनिराळ्या रूपांत दृश्यमान झालेला कॅनव्हासवर पाहता येऊ शकतो, याचं मोठं चित्तवेधक दर्शन हे प्रदर्शन रसिकांना घडवत आहे. बालगंधर्व कलादालनात शुक्रवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात सुमारे 500 चित्र आपल्या भेटीला वाट पाहत उभी आहेत.

कलातीर्थ संगीत-चित्रकला विद्यालयातर्फे हे प्रदर्शन आयोजिण्यात आलं आहे. अगदी पाच वर्षांपासून ते साठ वर्षं वयाच्या कलाकारांनी यात चित्र काढली आहेत.

विशेष म्हणजे, तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून काढलेली लोकमान्य टिळक यांच्या चेहऱ्याची रांगोळी ही या प्रदर्शनात आवर्जून पाहावी अशीच आहे. शिवाय, प्रदर्शनादरम्यान चित्रकलेची प्रात्यक्षिके सुद्धा अनुभवता येतील. रविवारपर्यंत (21 मे) हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

काय आहेत ही शब्दचित्रं ?

गुरुपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, निसर्ग, अर्घ्य, गणपती, देवी असे अनेकविध शब्द हे विविध चित्रांच्या स्वरूपात प्रदर्शनातील शब्दचित्रांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतील. " आम्ही विविध शब्द डोळ्यांपुढे ठेवून त्यांचा अर्थबोध करणारी अनेक चित्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने चितारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चित्राच्या मुळाशी एक शब्द आणि त्याचेच अनेक चित्राविष्कार यात पाहायला मिळतील," असे आयोजक अमोल काळे यांनी सांगितले.

Web Title: Arts exhibition at Balgandharva