भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही - ढेरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

पुणे - ""कविता हे अनोखे विश्‍व आहे. कवितेच्या जगात अनेक गमती-जमती असतात. काव्यात जसे सौंदर्य असते, तसे या विश्‍वात स्वैरपणे फिरताना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. अशावेळी भाषेची सोबत असणे आवश्‍यक आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही,'' असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित "मसाप गप्पा'मध्ये ढेरे यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा बोरवणकर यांनी ढेरे यांच्याशी संवाद साधला. संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. 

ढेरे म्हणाल्या, ""दर्जेदार साहित्यनिर्मिती ही एक महान कला आहे. केवळ जाज्वल्य भाषा नसते, तर वर्तमानाला समजून घेऊन, त्यावर आधारित काळाच्या पलीकडचे भाष्य करणारे साहित्य असले पाहिजे. संतांचे साहित्य असो किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांचे असो, त्या साहित्यात काळाच्या मर्यादा ओलांडून आधुनिकतेचे अतिशय समर्पक वर्णन केलेले आढळते. येणाऱ्या काळातही अशाच साहित्याची निर्मिती झाली पाहिजे.'' 

आपल्या लहानपणीची आठवण सांगताना ढेरे म्हणाल्या, ""वडिलांसोबत पुण्यातील अनेक ठिकाणांना मी भेट देत असे. त्या वेळी ते आवर्जून एखाद्या जागेचे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व सांगत. त्यांच्या याच सवयीमुळे माणूस म्हणून घडले. मला मनापासून वाटते, मुलांना चांगला माणूस म्हणून घडविण्यासाठी वेगळे काही करण्यापेक्षा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालविणे आवश्‍यक आहे.''