बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईस टाळाटाळ

मिलिंद संगई
शनिवार, 21 एप्रिल 2018

बारामतीत आजपासूनच नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ केलेला असून या पुढील काळात सातत्याने कारवाई करण्यावर भर असेल.

- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा, बा.न.प.

बारामती : नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हा निव्वळ कागदावर असून शहरात राजरोसपणे केले जाणारे अतिक्रमण रोखण्यास या विभागास पार अपयश आले आहे. शहरात दररोज तात्पुरत्या स्वरुपाचे व काही ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण लोक मागचा पुढचा विचार न करता सर्रास करतात. व्यावसायिक कामांसाठी होणारे अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणावर आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूकीला व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास होतो. अतिक्रमण करणारे मोजके व त्याचा त्रास सहन करणारे हजारो असे गणित बारामतीत दिसते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटवताना दिसतात खरे पण त्यांची पाठ फिरताच परत परिस्थिती जैसे थे होते. 

सामान्य लोक भीतीपोटी ही अतिक्रमणे मुकाट सहन करतात, ज्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा असते असा अतिक्रमण विभागही अनेकदा भीतीपोटी कारवाईच्या भानगडीतच पडत नाही, हे बारामतीतील चित्र आहे. वास्तविक अतिक्रमण विभागाने किमान वर्दळीच्या रस्त्यांवर होणारे अतिक्रमण रोजच्या रोज काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जो पर्यंत फार आरडाओरड होत नाही तो वर हा विभाग फार काही करतच नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. नागरिकांकडून फारच आरडाओरड झाली तर तात्पुरत्या स्वरुपाची कारवाई होत, अर्थात अतिक्रमण करणारे या कारवाईला फारशी भीक घालत नाहीत आणि प्रशासनाचा वचकच नाही ही बाब बारामतीत सर्वांनाच कळून चुकली आहे. 

वाहतूकीने व रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला हवा अशी हजारो बारामतीकरांची इच्छा आहे, मात्र प्रशासनाची कार्यालयाबाहेर पडून काही करण्याची तयारीच नाही, काही ठराविक लोकांसाठी हजारो लोकांना होणारा त्रास नगरपालिका प्रशासनाला काहीच वाटेनासा झाला असल्याने कडक कारवाई होत नाही. 

लुटूपुटीची कारवाई...

वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर नगरपालिका लुटूपुटूची कारवाई त्या दिवसापुरती करते, मात्र त्यात अजिबात सातत्य नसते व या कारवाईला कोणी जुमानत नाही असेच बारामतीत चित्र आहे. 

Web Title: Baramati Encroachment Department have Slow for taking action