विचार करण्याची सवय नेहमी सकारात्मकच हवी: डॉ. राजेंद्र भारुड

मिलिंद संगई
रविवार, 30 जुलै 2017

विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चिती करुन वाटचाल करणे गरजेचे आहे, असे सांगून भारुड म्हणाले, जीवनात जे काही करायचे ठरवले आहे ते उत्तमच व्हायला हवे असा तुमचा आग्रह असायला हवा, जीवनात स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षातच नाही तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाची  सवय वाढवा, जितके जास्त वाचन कराल, तितके तुम्ही प्रगल्भ व्हाल, त्याचा लाभ जीवन जगताना होईल.

बारामती : जीवनात विकास साध्य करायचा असेल तर आपली विचार करण्याची सवय नेहमी सकारात्मकच हवी, गरीबी ही परिस्थितीवर अवलंबून नसते तर ती दुबळ्या मानसिकतेवर अवलंबून असते, त्या मुळे सकारात्मक जीवन जगा....यशस्वी व्हायला पार्श्वभूमी लागत नाही, ध्येयासक्ती असेल आणि काहीतरी करुन दाखविण्याची उर्मी असेल तर माझ्यासारखा आदिवासी पाड्यातील एक मुलगाही उच्चपदस्थ सनदी अधिकारी बनू शकतो.... सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बारामतीतील विद्यार्थ्यांपुढे आपला जीवनपट उलगडला, आणि विद्यार्थीही भारावून गेले. 

येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन समितीने आयोजित मी पाहिलेल स्वप्न या व्याख्यानात ते बोलत होते. संस्थेचे सचिव द.रा. उंडे, विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) कंभोज, प्राचार्य डॉ. भरत शिंदे आदी  प्रसंगी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चिती करुन वाटचाल करणे गरजेचे आहे, असे सांगून भारुड म्हणाले, जीवनात जे काही करायचे ठरवले आहे ते उत्तमच व्हायला हवे असा तुमचा आग्रह असायला हवा, जीवनात स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षातच नाही तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर वाचनाची  सवय वाढवा, जितके जास्त वाचन कराल, तितके तुम्ही प्रगल्भ व्हाल, त्याचा लाभ जीवन जगताना होईल.

धुळे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील राजेंद्र भारुड हा मुलगा कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर पहिल्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होतो कसलीही पार्श्वभूमी नसताना खेडेगाव ते उच्चपदस्थ सनदी अधिकारी हा त्यांचा जीवनप्रवास बारामतीच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवला. 

प्राचार्य भरत शिंदे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. स्पर्धा परिक्षा विभाग प्रमुख डॉ. सुनील ओगले यांनी भारूड यांचा परिचय करुन दिला. आनंदा गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब खेडकर यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यादीप या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.