वेतनवाढीचा कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

पुणे - राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या वेतनवाढीमध्ये महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणीवर रुजू झालेल्या सुमारे साठ टक्के कर्मचाऱ्यांना भरीव वाढ मिळणार आहे. कामगारांचे वेतन ठरविण्याचे सूत्र कामगार संघटना सांगेल, त्याप्रमाणे करण्याचे प्रशासनाने मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. 

पुणे - राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या वेतनवाढीमध्ये महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणीवर रुजू झालेल्या सुमारे साठ टक्के कर्मचाऱ्यांना भरीव वाढ मिळणार आहे. कामगारांचे वेतन ठरविण्याचे सूत्र कामगार संघटना सांगेल, त्याप्रमाणे करण्याचे प्रशासनाने मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. 

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत काल मुंबई येथे एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये रावते यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले.

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही
या बैठकीत ठरल्याप्रमाणे, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनवाढीचा सर्वाधिक फायदा हा कनिष्ठ वेतनश्रेणीवर रुजू झालेल्या कामगारांना मिळणार आहे. मूळ वेतनामध्ये काही रक्कम मिळवून त्याला २.५७ ने गुणल्यानंतर येणारी रक्कम ही सुधारित मूळ वेतन म्हणून धरण्यात येणार आहे; परंतु जुन्या मूळ वेतनामध्ये किती रक्कम मिळवायची, हे मात्र अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यावर चर्चा होऊन ती रक्कम ठरल्यानंतर नवीन सुधारित वेतनश्रेणी समजणार आहे. याशिवाय वार्षिक वेतनवाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन टक्के देण्यात येणार आहे. घरभाडेभत्ता हा शासकीय कामगारांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही या बैठकीत मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व निर्णयांचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकाद्वारे स्वागत केले आहे.

Web Title: Benefits for the wage hike of junior class employees