भांडारकर संशोधन संस्थेत ‘हेरिटेज ऑडिटोरियम’ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

‘हेरिटेज ऑडिटोरियम’चा एकूण खर्च दोन कोटी नव्वद लाख रुपये आहे. संस्थेच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेल्या पाच कोटी रुपये अनुदानातून हा खर्च भागविण्यात येत आहे. जून २०१६ मध्ये सभागृहाच्या बांधकामास सुरवात झाली असून, या वर्षी मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. 

- भूपाल पटवर्धन, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

पुणे - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत १९३३ मध्ये बांधलेली छापखान्याची वास्तू आता कात टाकत आहे. महाभारताच्या विविध खंडांसहित प्राकृत शब्दकोश यांसारख्या विविध प्रकाशनांच्या छपाईची ही वास्तू साक्षीदार आहे. छापखान्याच्या या जागेचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. वास्तूच्या ऐतिहासिक संदर्भांचे जतन करीत तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर आधारित ‘हेरिटेज ऑडिटोरियम’ बांधण्यात येत आहे.  

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या आवारातच छापखान्याची (प्रेस) ही वास्तू आहे. कालपरत्वे तिची पडझड झाली. त्यामुळे वापराविना संबंधित वास्तू गेली काही वर्षे पडून होती. मात्र, केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून संस्थेने छापखान्याच्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. शंभर फूट लांब आणि चाळीस फूट रुंद असलेल्या या सभागृहात प्राचीन काळातील हस्तलिखितांची स्कॅनिंग केलेली चित्रे लावण्यात येणार आहेत. सभागृहात साधारणः १०५ ते १२० खुर्च्यांची व्यवस्था असेल. स्वतंत्र कंट्रोल रुमद्वारे आतील ध्वनी व प्रकाश व्यवस्थेचे संयोजन करण्यात येईल.

   संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्याच्या उद्देशाने छापखान्याच्या जागेवर सभागृह बांधण्यात येत आहे. वास्तुविशारद हेमंत महाजनी यांच्या मार्गदर्शनानुसार त्याचे काम सुरू आहे. महाभारतासहित विविध प्रकाशनांची छपाई या वास्तूत झाली आहेत. या ठिकाणी ग्रंथ दालनही असेल, तसेच आतापर्यंत झालेल्या विविध ग्रंथांविषयीची माहितीही वाचायला मिळेल.’

Web Title: Bhandarkar Oriental Research Institute, the Heritage Auditorium

टॅग्स