बिडकरांना धंगेकरांचा धक्का

बिडकरांना धंगेकरांचा धक्का

पुणे - शहरात भाजपची चलती होत असताना कसबा पेठेतील महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांचा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला, तर लाटेमध्ये रवींद्र धंगेकर हिरो ठरले. सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रभागातील चारही जागा निवडून आणताना तीन विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला, तर औत्सुक्‍याची लढत रेश्‍मा भोसले यांनी जिंकली अन्‌ त्याच प्रभागात भाजपचे तीन उमेदवारही निवडून आले. 

पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागात (क्रमांक ७) भाजपचे आदित्य माळवे, सोनाली लांडगे, राजश्री काळे यांच्यासह पुरस्कृत भोसले निवडून आल्या. या प्रभागात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव लक्षणीय ठरला. डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागात (क्र. १४) सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे आणि स्वाती लोखंडे निवडून आले. या प्रभागात शिरोळे यांनी उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेवक राजू पवार यांचा पराभव केला. तीन विद्यमान नगरसेवक आणि खासदार पुत्र असलेल्या सिद्धार्थ यांच्या लढतीची पूर्वीच खूप चर्चा झाली होती. कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागात (क्र. १६) काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर, काँग्रेसच्या सुजाता शेट्टी, भाजपचे योगेश समेळ आणि शिवसेनेच्या पल्लवी जावळे विजयी झाल्या. धंगेकर आणि बिडकर यांच्या लढतीबद्दल शहरात उत्सुकता होती. भाजपची लाट आणि भक्कम पाठबळ असल्यामुळे बिडकर अखेरच्या क्षणी बाजी मारतील, अशी अटकळ फोल ठरली आणि घराघरांत पोचलेला धंगेकर यांचा प्रचार निर्णायक ठरला. 

घोले रस्त्यातंर्गत येणाऱ्या ७, १४ आणि १६ प्रभागांची मतमोजणी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडासंकुलात सकाळी १० वाजता सुरू झाली. बिडकर विरुद्ध धंगेकर लढतीच्या मतमोजणीच्या वेळी वादविवाद झालेच. या वेळी एक महिलेने ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन पोलिसांची मदत मागितली. त्यामुळे गोंधळ उडाला. परंतु, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. 

मतमोजणीदरम्यान प्रभाग ७ मधील निकाल निश्‍चित झाल्यावर भोसले मतमोजणी केंद्रात आल्या, तर धंगेकर निकाल निश्‍चित झाल्यावर बालेवाडीत पोचले. प्रभाग ७ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी होतील, असे पक्षानेही गृहीत धरले नव्हते. मात्र, भाजपची लाट या प्रभागातही चालल्याचे दिसून आले. 

रेश्‍मा भोसले यांना हवे महापौरपद! 
निवडून आल्याचे समजल्यावर रेश्‍मा भोसले मतमोजणी केंद्रात आल्या. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान केले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारून अन्याय केला आणि भाजपने न्याय दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच विजयी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, शहराचे महापौर व्हायला आवडेल, असे सांगत महापौरपदाच्या शर्यतीत आपणही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com