आमदार लांडगे यांचा भाजप प्रवेश दसऱ्यापूर्वी

मिलिंद वैद्य
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

पिंपरी - गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला असून, मुंबईत भाजप कार्यालयात विजयादशमीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या २७ ऑक्‍टोबरला भोसरी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असून, त्यात लांडगे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल होणार आहेत. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील आणखी तीन विद्यमान आमदार भाजपत प्रवेश करतील.

पिंपरी - गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला असून, मुंबईत भाजप कार्यालयात विजयादशमीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या २७ ऑक्‍टोबरला भोसरी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला असून, त्यात लांडगे यांचे शेकडो समर्थक भाजपत दाखल होणार आहेत. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यातील आणखी तीन विद्यमान आमदार भाजपत प्रवेश करतील. शहरातील लांडगे समर्थकांत राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामुळे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार लांडगे यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो. भोसरी येथील मेळाव्याला स्वत: अमित शहाच उपस्थित राहणार असल्याने लांडगे समर्थकांचा प्रवेश अगदी वाजत गाजत होणार आहे. त्यामुळे भाजपला शहरात सत्तेवर येण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या लांडगे समर्थकांमध्ये १४ विद्यमान नगरसेवक, सहा माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतील एका बड्या मुस्लिम नेत्याचा जवळचा नातेवाईक, तसेच काँग्रेसचा महापालिकेतील एक मोठा पदाधिकारी यांचाही यादीत समावेश आहे. या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहींनी आपले नाव आत्ताच प्रसिद्ध करू नका, आम्ही प्रवेश करणार आहोत, असे सांगितले तर काहींनी आमचे नाव उगाचच यादीत जोडले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या यादीबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.

भाजप प्रवेशाच्या या नियोजित सोहळ्यामुळे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर चलबिचल सुरू असून, गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार लांडगे समर्थकांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आणखी काही असंतुष्ट पक्षातून बाहेर पडण्याची भाषा बोलत आहेत. एकीकडे प्रभाग रचनेतील बदलाने अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादीला पक्षांतराचाही मोठा फटका बसणार असे दिसते. ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पळापळ सुरू असून, भोसरीतील जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे सोपविल्याचे कळते.

 

जगताप यांच्या सोबत लांडगे
भाजपने आमदार लांडगे यांना पक्षात घेऊन महापालिका निवडणुकीची भोसरीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याची तयारी केली आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे हे दोघे मिळून महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. लांडगे यांच्या प्रवेशामुळे भाजपची भोसरीतील स्थिती भक्कम होणार असून, चार नगरसेवकांची प्रभाग रचना पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे.

Web Title: bjp entry by mla maheshdada landage