दबावानंतरही कार्यक्रम दणदणीत साजरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - "युवा नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका,' असे सांगण्यासाठी एका नेत्याने नगरसेवकांना दूरध्वनी करून दबाव आणल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतील गटबाजी रविवारी उघड झाली. मात्र, या दूरध्वनींना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे युवा नगरसेवकांचा कार्यक्रम दणदणीत साजरा झाला. 

पुणे - "युवा नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका,' असे सांगण्यासाठी एका नेत्याने नगरसेवकांना दूरध्वनी करून दबाव आणल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतील गटबाजी रविवारी उघड झाली. मात्र, या दूरध्वनींना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे युवा नगरसेवकांचा कार्यक्रम दणदणीत साजरा झाला. 

महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर सुमारे 30 युवा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने आयोजित केला होता, त्यासाठी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, तसेच गणेश घोष आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजताची होती. तत्पूर्वीच, या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये म्हणून पक्षातील एका नेत्याने काही नगरसेवकांना दूरध्वनी करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे दोन- तीन नगरसेवक कार्यक्रम होत असलेल्या सभागृहाच्या आवारातून परतले. त्यानंतरही 25 नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री बापट आणि मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रम संपेपर्यंत संबंधित नेत्याने केलेल्या दूरध्वनींची माहिती अन्य कार्यकर्त्यांना व नगरसेवकांनाही समजली, त्यामुळे या गटबाजीबाबत चर्चा सुरू होती. 

याप्रसंगी बापट म्हणाले, ""प्रत्येक कार्यकर्त्याने एका वर्षात किमान 10 नवीन कार्यकर्ते जोडले, तर हजारो कार्यकर्त्यांची फौज पुण्याच्या विकासासाठी कार्यरत राहील. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हालाही लोकांची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.'' 

या वेळी महापौर टिळक यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशात "भाजयुमो'चा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले, तर शहराध्यक्ष गोगावले यांनी भविष्यकाळात पक्षाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सुनील मिश्रा यांनी प्रास्ताविक केले, तर जयदीप पारखी, अमित देशमुख यांनी स्वागत केले. 

16 नगरसेविका, 9 नगरसेवक उपस्थित ! 
मुक्ता जगताप, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, छाया मारणे, हर्षाली माथवड, गायत्री खडके, अर्चना पाटील, वृषाली चौधरी, वृषाली कामठे, नीता दांगट, ज्योती गोसावी, श्‍वेता गलांडे, वासंती जाधव, साईदिशा माने, सिद्धार्थ शिरोळे, योगेश समेळ, संदीप जऱ्हाड, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, आनंद रिठे, वीरसेन जगताप, सुशील मेंगडे आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांचा या प्रसंगी सत्कार झाला. 

Web Title: BJP internal politics