भाजपच्या प्रचारात मंत्र्यांची फौज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची फौजच प्रचारात उतरवली आहे. 

पिंपरी - प्रचाराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना सर्वच पक्षांत प्रचाराची राळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची कमतरता असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. भाजपने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांची फौजच प्रचारात उतरवली आहे. 

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सभेपाठोपाठ सायंकाळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रचारसभा आकुर्डीत झाली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा शुक्रवारी प्रसिद्ध झाला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत असून, रविवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सभा होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत स्वत: लक्ष्य घातल्याने ही निवडणूक कमालीची चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मंत्र्यांची फौज प्रचाराला लागली आहे. मुख्यमंत्र्यांची या अगोदरही एक सभा चिंचवडमध्ये झाली. शनिवारी दुसरी सभा होत आहे. मुनगंटीवार यांची सभा अखेरच्या दिवशी आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व गृहराज्य मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सभेसाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे हे दोन्ही नेते व्यस्त होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र स्टार प्रचारकांची कमतरता दिसते. अजित पवार, शशिकांत शिंदे आणि नवाब मलिक वगळता अन्य कोणत्याही मोठ्या नेत्यांची सभा राष्ट्रवादीकडून झालेली नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अखेरच्या दिवशी सभा घेण्याचे  प्रयत्न स्थानिक नेत्यांकडून सुरू आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा दोन दिवसांत अपेक्षित आहे.

शिवसेनेच्या वतीने मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. आता संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभा व रोड-शोचे आयोजन केले आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा शुक्रवारी झाल्या आहेत. आणखी नेते प्रचारासाठी बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पंकजा मुंडे यांची सभा आवश्‍यक
भाजपने पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, अजूनही जुन्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय करण्यात शहर भाजपकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहरात मुंडे समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा होणे गरजेचे आहे. शहरात भोसरी विधानसभा विभागात पहिला मुंडे समर्थक उमेदवार रवी लांडगे यांच्या रूपाने बिनविरोध निवडून येणार आहे. ही घटना भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. 

Web Title: BJP ministers in the military campaign