पिंपरीत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष मुद्यावरून गुद्यावर

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

"पराभव समोर दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकलेल्या राष्ट्रवादीकडून गुंडगिरीचे प्रकार सुरू झाले आहेत."
- लक्ष्मण जगताप

पिंपरी : प्रत्यक्ष प्रचारापूर्वीच कट्टर प्रतिस्पर्धी 'राष्ट्रवादी'बरोबरचा भाजपचा संघर्ष मुद्यावरून गुद्यावर (ता.17) मंगळवारी आला. त्यामुळे यावेळच्या पालिका निवडणुकीतील पहिली एनसी (अदखलपात्र गुन्हा) शहराचे माजी महापौर, एनसीपीचे स्थानिक नेते, शहराचे मुख्य प्रवक्ते आणि विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांच्याविरुद्ध दाखल झाली.

 

भाजपचे संत तुकारामनगर, पिंपरी (प्रभाग क्र.20) मधील संभाव्य उमेदवार आणि कामगार नेते यशवंत भोसले यांनी यासंदर्भात पिंपरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 'टॉक शो'मध्ये धमकावून शिवीगाळ केल्याबद्दल बहल यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांनी एनसी दाखल केली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांचा एकेरी उल्लेख झाला.गेल्या काही दिवसांत एनसीपीच्या पदाधिकाऱ्यांकडून गुंडगिरीचा हा सलग दुसरा प्रकार घडला असून त्यातून शहरात कोणाची दडपशाही सुरू आहे, हे दिसून येत आहे, असे जगताप म्हणाले. 

या गुंडगिरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असून सराईतपणे दर निवडणुकीला असे प्रकार करणाऱ्या बहल यांना तडीपार करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. तसेच प्रचारासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी उद्या (ता.18) पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना भेटून करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 

वाल्याचादेखील वाल्मीकी झाला असे सांगत भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुण्यासह इतरत्र देत असलेल्या गुंडांच्या प्रक्षप्रवेशाचे आज (ता.17) येथे समर्थन केले. रिपब्लिकन नेते आणि केंदीय मंत्री रामदास आठवले यांच्या याबाबतच्या वक्‍तव्याचेही लक्ष्मण जगताप यांनी आज (ता.17) समर्थन केले. गुंडांना राजकीय पक्षात प्रवेश देऊन त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या वक्तव्यालाही त्यांनी पाठिंबा दिला.