भाजपला सत्तेची मस्ती - अजित पवार

भाजपला सत्तेची मस्ती - अजित पवार

पिंपरी - ‘‘भाजपला सत्तेची नशा आणि मस्ती चढली आहे. त्यामुळे, त्यांचे मंत्री आणि आमदार बेताल वक्तव्ये करत आहेत. मात्र, त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. महागाई कमी करू, परदेशांमधून काळा पैसा आणू यासारखी गाजरं प्रत्येक वेळीस जनतेला दाखविण्यात आली. परंतु, जनता आता हे सहन करणार नाही,’’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी हल्लाबोल केला.

निगडी प्राधिकरणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, प्राधिकरण येथे आयोजित जाहीर सांगता सभेत पवार यांनी भाजप-शिवसेना सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. पक्षाचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पंढरपूर येथील भाजप पुरस्कृत आमदार परिचारक यांनी देशाचे शूरवीर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संतापजनक वक्तव्य केले आहे. भारतीय जवानांच्या पराक्रमी परंपरेचा तो अपमान आहे. त्यांचे हे वक्तव्य सडक्‍या मनोवृत्तीचे लक्षण आहे. भाजप सरकारने प्रत्येक वेळेस जनतेला गाजर दाखविण्याचे काम केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळेस करू, परदेशातील काळा पैसा आणतो. निवडणूक झाल्यावर बोपखेल येथील रस्ता खुला करतो, बैलगाडा शर्यत चालू करतो यासारखी आश्‍वासने दिली. तुम्ही अडीच वर्षे सत्तेत आहात. मग, तुम्ही झोपा काढल्या काय ?’’

राज्यात निवडणुका आल्यावर मतांवर डोळा ठेवून मेट्रो, शिवस्मारक आणि इंदू मिल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. म्हणे, ५ वर्षे भाजपच्या बॅंकेत मतदान ‘डिपॉझिट’ करा. काय थापा मारता? अशी टीकाही त्यांनी केली. 

एकनाथ खडसे यांचा काटा काढायचा होता... 
पालकमंत्री गिरीश बापट हे बेताल वक्तव्ये करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. राज्य सरकारवर १५ भ्रष्टाचारांचे आरोप झाले. परंतु, त्यांना एकनाथ खडसे यांचा काटा काढायचा होता. उर्वरित मंत्र्यांना त्यांनी ‘क्‍लीन चिट’ दिली असल्याची टीकाही पवार यांनी केली.

आता, त्यांना ऊब मिळत आहे...
‘गुंड- दलालांच्या हातात पालिकेची सूत्रे देणार काय ? असा सवाल करून, पूर्वी आमच्याकडे भाई-दादा-भाऊ होते. परंतु, एकमेकांच्याजवळ आले तर त्यांना चटके बसत होते. मात्र, आता त्यांना ऊब मिळत आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

पवार म्हणाले...
 शहर ‘शांघाय किंवा सिंगापूर करू, असे कधीच सांगितले नाही. परंतु, जगात ‘पिंपरी-चिंचवड म्हणूनच ओळख निर्माण झाली पाहिजे. 
 नाशिकमधील ३-४ गोष्टी सांगून राज ठाकरे टिमक्‍या वाजवित आहेत. आम्ही टिमकी वाजविली असती तर अवघा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय झाला असता.
 नागपूर महापालिकेत स्वतः कामे केली नाहीत. आता इथे दिवे लावायला आले.
 कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा, कोपर्डीतील आरोपी, दाभोळकर- पानसरे यांचे मारेकरी अजून सापडले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com