जागावाटपाचा तिढा सुटणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुण्यात पक्षाची चांगली ताकद असल्याने आमच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे 28 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चा करणार असल्याचे भाजपने सांगितले असून, जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. स्थानिक पातळीवरच जागावाटपाचा प्रश्‍न सुटेल. काही अडचण आल्यास पक्षाध्यक्ष आठवले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. 
- भूपेश थुलकर, प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष 

पुणे - ""भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा सुरू आहे, तोपर्यंत भाजप- रिपब्लिकन पक्षातील (आठवले गट) जागावाटपाचा तिढा सोडविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री व प्रभारींना दिले आहेत. पुण्यात रिपब्लिकनला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, यादृष्टीनेही पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी दिली. 

पुणे स्टेशन येथील पक्ष कार्यालयाला भेट देऊन थुलकर यांनी रिपब्लिकनची निवडणुकीसाठी झालेली तयारी व प्रभागनिहाय स्थिती जाणून घेतली. तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

थुलकर म्हणाले, ""पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांच्यातील चर्चेनुसार भाजप- सेनेच्या युतीला विलंब होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्हा परिषद, पंचायती समित्या व महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकनबरोबर जागावाटपाबाबत तत्काळ चर्चा करण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई, उल्हासनगर, पुणे शहर वगळता उर्वरित ठिकाणी भाजप- सेना युती होण्याची शक्‍यता कमी आहे. रिपब्लिकनला जनाधार असलेल्या ठिकाणीच आम्हीही जागा मागत आहोत.''