'त्यांचा' निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

प्रश्न सोडविण्याची धमक राष्ट्रवादीत...!
भाजप सरकारने गेली दोन वर्षे केवळ घोषणाबाजी करून शेतकरी, कामगार, उद्योजकांसह सामान्यांची घोर निराशा केली. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा चुकीच्या धोरणांचा फटका सामान्यांना न सोसणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त राष्ट्रवादीमध्ये आहे, हे लोकांनी ओळखले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

माळेगाव : "पुणे जिल्ह्यात गेली तीन वर्षे दुष्काळी स्थिती असताना जनतेची, गुराढोरांची तहान भागविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिवाय आरोग्य, शिक्षणासारख्या मूलभूत गरजांबाबतही दर्जेदार काम केले आहे. त्यामुळेच पंतप्रधानांपासून अनेक भाजपच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषद प्रशासनाचे जाहीर कौतुक केले आहे. असे असताना आमच्यावर खोटेनाटे आरोप करून मतदारांमध्ये स्वतःची निष्क्रियता लपविण्याचा विरोधकांचा प्रकार केविलवाणा आहे,'' अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

बारामती तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधी लढती असलेल्या गटांवर अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले. त्यानुसार माळेगाव- पणदरे या गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तालुक्‍यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांना कोणत्याही स्थितीत मताधिक्‍य मिळावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची काळजी घ्यावी, असे सांगून अजित पवार म्हणाले, "बारामतीची सर्वांगीण प्रगती, सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी, सहकाराने केलेला कायापालट, जीर्णोद्धार झालेली श्रद्धास्थळे, दुष्काळ हटविण्यासाठी झालेली कामे, शैक्षणिक कार्य, औद्योगीकरणात तालुका पुढे आहे. वाडीवस्तीवरील रस्ते, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, आरोग्याच्या सेवासुविधा उपलब्ध झाल्या असताना, विरोधक मात्र विकासावर न बोलता विनाकारण टीकात्मक वक्तव्य करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत.''

बारामती तालुक्‍यात आघाडीची गावं म्हणून माळेगाव, पणदरे पुढे आली आहेत. विशेषतः माळेगावात यापुढील काळात अंतर्गत रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे यांनी सांगितले.