जनावरांच्या बाजारात बैल उधळल्याने लोकांची धांदळ उडाली

bull run in cattle market people are scare
bull run in cattle market people are scare

आळेफाटा (ता. जुन्नर) : बेल्हे येथे जनावरांच्या आठवडे बाजारात एक मस्तवाल खोंड (बैल) दोर तोडून उधळल्याने बाजारकरूंची एकच तारांबळ उडाली. बैलाने शेळीबाजाराकडे मोर्चा वळवताच अनेकांना पळताभुई थोडी झाली, मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.


बेल्हे येथे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात दर सोमवारी जनावरांचा मोठा आठवडे बाजार भरतो. येथील जनावरांच्या आठवडे बाजारात मोठ्या संख्येने बैल विक्रीसाठी येतात. याठिकाणी कल्याण, मुरबाड, नाशिक, सिन्नर, बीड आदी ठिकाणांहून व्यापारी बैल खरेदी - विक्रीच्या निमित्ताने येत असतात. येथून काही अंतरावरील ओढ्याजवळ शेळ्या - मेंढ्यांचाही बाजार भरतो. परिसरात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचा पार्श्वभूमीवर, बैलबाजारात बैलांची चांगली आवक झाल्याने बाजार गर्दीने फुलून गेला होता. 

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बैल बाजारातील एक मस्तवाल खोंड (बैल) खुंटीचा दोर तोडून उधळला. यामुळे  बाजारकरूंची तारांबळ उडाली. बैलांच्या दावणींमधून मार्ग काढत त्याने ओढ्याजवळ असलेल्या शेळी बाजाराकडे मोर्चा वळवला. यावेळी शेळी बाजारातील लोकांनी आरडाओरड केल्यावर तो जवळच्या रिकाम्या शेतात उधळत फिरत होता. जवळपास तासभर प्रयत्न करूनही तो कुणाच्याही हाताला लागत नव्हता. जवळ जाणाऱ्याकडे रोखून पाहत धावून जाण्याच्या त्याच्या अविर्भावामुळे त्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांचीही त्रेधातिरपीट उडाली होती. अनेक तरुण दोर घेऊन झाडांच्या आडोशाला उभे राहून त्याला फासा टाकून पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्याचा अविर्भाव पाहून त्याच्या समोर जाण्यास कुणाचेही धाडस होत नव्हते.  एका तरुणाने कडुनिंबाच्या झाडावर चढून वरून बैलाच्या गळ्यात दोराचा फासा फेकण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्याला यश येत नव्हते. हा उधळलेला खोंड कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीला विसावलेला असताना, एका तरुणाने झाडाच्या आडून फेकलेला दोराचा फासा त्याच्या शिंगांसह गळ्यात अडकला. यावेळी त्याच्याजवळ इतर दोन बैल आणून उभे केल्यावर त्याला शिताफीने पकडण्यात यश आले आणि या नाट्यावर पडदा पडला. त्यानंतर त्याला पिकअप गाडीत टाकून बाजारात न नेता पुन्हा थेट घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी शेतकरी वर्गातून बैलांना  बऱ्यापैकी मागणी असल्याचे चित्र दिसून येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com