चाळीस लाखांची खंडणी मागणाऱ्या बंटी-बबलीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रियकराच्या मदतीने दाम्पत्याकडे 40 लाखांची खंडणी मागणाऱ्या बंटी-बबलीला गुन्हे शाखेने अटक केली. टीव्हीवर क्राइम सिरियल बघून त्यांनी हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

पुणे - प्रियकराच्या मदतीने दाम्पत्याकडे 40 लाखांची खंडणी मागणाऱ्या बंटी-बबलीला गुन्हे शाखेने अटक केली. टीव्हीवर क्राइम सिरियल बघून त्यांनी हा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्रान उस्मान शेख (रा. मार्केट यार्ड) यांना चार- पाच दिवसांपासून अनोळखी मोबाईलवरून धमकीचे फोन येत होते. "आम्ही पोलिस असून, तुम्ही कासव तस्करी करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तुम्ही 40 लाख रुपये द्या, अन्यथा पत्नीला अटक करू. तसेच, पैसे न दिल्यास तुझ्या मुलीला पळवून नेण्यात येईल,' अशी धमकी देण्यात येत होती. शेख यांच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल हा त्यांच्या घरी कामाला असलेल्या मोलकरणीच्या मुलीचा होता. याबाबत तक्रार दिल्यावरून मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेतील युनिट तीनचे पथक करीत होते. मोलकरणीची मुलगी एक फेब्रुवारीपासून गायब असून, तिचा मोबाईल बंद 
असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील, सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, प्रकाश अवघडे, अशोक भोसले, अनिल घाडगे, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध घेतल्यावर ती सापडली. त्या वेळी महाविद्यालयातून घरी येताना दोघांनी अपहरण करून एका खोलीत बंद केले, तेथून सायंकाळी खडी मशिन चौकात आणून व्हॅनमधून ढकलून दिल्याचा बनाव तिने रचला. 

पोलिसांनी तिला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता तिने खरा प्रकार सांगितला. प्रियकर मतीन शेख याच्यासोबत लग्न ठरले होते, त्याला मोबाईलचे दुकान सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी आईने बॅंकेतून मुदत ठेवीतील 60 हजार रुपये काढून दिले; परंतु आई तिच्याकडे पैसे परत मागत होती. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. आईचे पैसे परत करण्यासाठी टीव्ही सिरियल पाहून कट रचला. मतीन याने त्याच्याकडे दुरुस्तीला आलेल्या मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.