धारवाडकर बंधुंनी काढले स्वखर्चाने कालव्यातील चोपन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

यापूर्वी ग्रामपंचायतने कालव्यातील गाळ काढला होता. मात्र, मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया न करता पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या पाण्याखाली पुन्हा चोपन तयार होत आहे. त्यामुळे त्यातून पाणी पाझरत नाही.

मांजरी : उन्हाळ्यामुळे पाणी पातळी खाली गेल्याने व कालव्यात चोपन बसल्याने परिसरातील बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. येथील माजी सरपंच व ग्रामपंचात सदस्य पुरूषोत्तम धारवाडकर व संजय धारवाडकर यांनी स्वखर्चाने कालव्यातील गाळ काढला आहे. त्यामुळे बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.

यापूर्वी ग्रामपंचायतने कालव्यातील गाळ काढला होता. मात्र, मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया न करता पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या पाण्याखाली पुन्हा चोपन तयार होत आहे. त्यामुळे त्यातून पाणी पाझरत नाही. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी व कूपनलिकांवर होऊन त्या कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच पाणी प्रश्र्नाला सामोरे जावे लागत आहे. या विहिरी व कूपनलिकांना पाझराद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य धारवाडकर बंधूंनी स्वखर्चाने साडेसतारानळी पवार वस्ती ते पंधरानंबर पालिका हद्दीपर्यंत असा सुमारे एक किलोमीटर अंतरातील जुन्या कालव्यामधील चोपन जेसीबी यंत्राच्या साह्याने काढून टाकले आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत पुन्हा मोकळे झाले असून पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सदस्य संजय धारवाडकर म्हणाले,""महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी हा परिसर पाण्यासाठी बोअरवेलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. उन्हाळ्यात येथील नागरिकांना पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. काही वर्षांपासून कालव्यात जॅकवेलचे पाणी सोडले जात असल्याने या नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. मात्र, चोपन बसल्यावर पाण्याचे स्त्रोत बंद होत आहेत. त्यासाठी कालव्यातील चोपन काढून टाकले आहे.'' 

Web Title: canel cleaning in Manjri