पाण्याच्या चोरीवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

पुणे - पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पर्वती, वडगावशेरी आणि येरवड्यातील केंद्रांवर कॅमेरे बसविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे, त्यामुळे टॅंकरच्या फेऱ्या व त्यात भरले जाणारे पाणी यावर देखरेख ठेवता येणार आहे.  

या योजनेसाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार  आहे. पुढील दोन महिन्यांत ही कामे केली जातील, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पाणी भरण्यासाठी टॅंकरचालकांना आधी पैसे भरून पावती (पास) घ्यावी लागते. मात्र, काही टॅंकरचालक ते न घेताच पाणी घेत असल्याच्या तक्रारी आहेत, तसेच स्वस्तात पाणी घेऊन मनमानी शुल्क आकारून ते विकले जात असल्याच्या घटना घडतात. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी घेतले जात असल्याचेही यापूर्वी समोर आले आहे. वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने प्रत्येक टॅंकरवर लक्ष ठेवण्यासाठी या केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले जाणार आहेत. संबंधित केंद्रावर पाणी भरण्यासाठी आलेले टॅंकर, पाणीपुरवठा करण्याचे ठिकाण यांची नोंदणी ठेवली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार त्यांची सीसीटीव्हीमुळे खातर जमा करणे शक्‍य होणार आहे. 

महापालिका आणि खासगी टॅंकरबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मासिक पास आणि तात्पुरते पास असलेल्या टॅंकरची नोंद ठेवली जाते. आता सीसीटीव्हीमुळे केंद्रावर आलेला टॅंकर, त्याची क्षमता व प्रत्यक्ष भरलेले पाणी याचीही नोंद उपलब्ध होणार आहे.  
-प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा