पुणेकरांना 'लॉलीपॉप' दाखविले नाही - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पुणे - खंडपीठाची मागणी करणाऱ्या पुणेकरांना मी "लॉलीपॉप' दाखविले, असे विधान मी केले नसल्याचा खुलासा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. याबाबत पाटील यांनी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली. कोल्हापूर आणि पुणे येथे खंडपीठ व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात कोल्हापुरात सर्वपक्षीय बैठक पार पडली. यात पाटील यांनी खंडपीठाची मागणी करणाऱ्या पुणेकरांना "लॉलीपॉप' दाखविल्याचे वक्तव्य केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया पुण्यातील वकील वर्गात उमटली. "सोशल मीडिया'वरूनही या विधानावर टीका झाली. याचा निषेध करण्यासाठी पुणे बार असोसिएशनने सोमवारी दुपारी सभा आयोजित करण्याचे ठरविले. याप्रकाराची माहिती पाटील यांच्यापर्यंत त्यांच्या समर्थकांनी पोचविली. त्यामुळे पाटील यांनी दौंडकर यांच्याशी संपर्क साधला. ""मी असे विधान केले नाही, दोन्ही ठिकाणी खंडपीठ झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जावे लागेल,'' असा खुलासा पाटील यांनी केल्याची माहिती दौंडकर यांनी दिली.

असोसिएशनतर्फे लवकरच सर्वसाधारण सभा बोलाविण्यात येणार आहे. या सभेत खंडपीठाच्या आंदोलनासंदर्भात "कोअर कमिटी' स्थापन करणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

Web Title: chandrakant patil talking