शहरातील राजकारणावर गावकीचाच प्रभाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची आता महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी येथील राजकारणावर आजही गावकी-भावकीचाच प्रभाव कायम असल्याचे महापालिकेच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. १२८ पैकी तब्बल ७७ (६० टक्के) नगरसेवक स्थानिक म्हणजेच गाववाले आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची आता महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी येथील राजकारणावर आजही गावकी-भावकीचाच प्रभाव कायम असल्याचे महापालिकेच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. १२८ पैकी तब्बल ७७ (६० टक्के) नगरसेवक स्थानिक म्हणजेच गाववाले आहेत.

शहराचे आजवरचे सर्व राजकारण हे स्थानिक मंडळींच्या हातात आहे. आताचे भाजपचे आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर वगळता आजवरचे शहरातील सर्व आमदार-खासदार स्थानिक होते. आताचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे स्थानिक आहेत. सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष (संजोग वाघेरे, लक्ष्मण जगताप, राहुल कलाटे, सचिन साठे) हेसुद्धा स्थानिक आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांतही गावकीला प्राधान्य असते. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्येही १२८ पैकी ६७ नगरसेवक गाववाले होते. या वेळी त्यांची संख्या दहाने वाढलेली आहे.

तळवडेचे भालेकर : तळवडे गावात भालेकर बंधूंची पाटीलकी आहे. गतवेळी शांताराम ऊर्फ बापू भालेकर नगरसेवक होते. या वेळी तेथून पंकज भालेकर, प्रवीण भालेकर जिंकले.
 

थेरगावचे बारणे : थेरगावातील राजकारणात बारणे घराण्याचे वर्चस्व तीस वर्षांपासून आहे. या वेळी माजी उपमहापौर झामाबाई बारणे, माजी नगरसेविका माया बारणे, कैलास बारणे, नीलेश बारणे, अर्चना बारणे, अभिषेक बारणे असे एकाच आडनावाचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. 

भोसरीचे लांडे, लांडगे, लोंढे, फुगे, गव्हाणे : भोसरी गावठाण परिसरातील चारही प्रभागांतून विजयी झालेल्या नगरसेवकांमध्ये लांडगे, लांडे, लोंढे, गव्हाणे, फुगे या भावकीतील घराण्यांचाच कायम समावेश असतो. लांडगे आडनावाचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सारिका लांडगे, राजेंद्र लांडगे, असे चार नगरसेवक विजयी झाले आहेत. भोसरीतूनच विक्रांत लांडे, श्‍याम लांडे, नम्रता लोंढे, संतोष लोंढे, अजित गव्हाणे, सोनाली गव्हाणे हे समान आडनावाचे नगरसेवक जिंकले.

पिंपरीचे वाघेरे : पिंपरीगावातून वाघेरे आडनावाचे सात उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले. आता दोघे पालिकेचे कारभारी झाले आहेत.

पिंपळे सौदागरचे काटे : पिंपळे सौदागरमध्ये काटे कंपनीचा दबदबा आहे. तिथेसुद्धा या वेळी भावकीच एकमेकांच्या विरोधात ठाकली आणि अखेर नाना काटे, शीतल काटे हे दांपत्य आणि तिसरे शत्रुघ्न काटे नगरसेवक झाले.

चिंचवडचे चिंचवडे : चिंचवडगाव चिंचवडेंचे अशी जुनीच ओळख आहे. तेथून अश्‍विनी चिंचवडे, सचिन चिंचवडे हे सभागृहात बसणार आहेत.

रावेतचे भोंडवे : रावेत गावाचा सातबारा भोंडवे घराण्याकडे आहे. तेथून सख्खे भाऊ परस्पर विरोधात उभे होते. थोरले तुकाराम पराभूत झाले आणि धाकटे मोरेश्‍वर पुन्हा नगरसेवक झाले.

सांगवीचे शितोळे, ढोरे - सांगवी म्हणजे शितोळे आणि ढोरे यांचे गाव. मागच्या पंचवार्षिकला अतुल शितोळे, प्रशांत शितोळे नगरसेवक होते. त्या दोघांचाही पराभव झाला आणि हर्शल ढोरे तसेच माजी उपमहापौर उषा ढोरे पुन्हा सभागृहात आल्या.

Web Title: cities influence politics rural