सिंहगडावर शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

खडकवासला - शिवाधीन दुर्गसंवर्धन संस्था व सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या संयुक्त सहभागातून कार्यकर्त्यांनी रविवारी सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविले. यामुळे गस्तीची पायवाट, बुरुजाचा परिसर दिसू लागला आहे.

खडकवासला - शिवाधीन दुर्गसंवर्धन संस्था व सिंहगड पावित्र्य मोहिमेच्या संयुक्त सहभागातून कार्यकर्त्यांनी रविवारी सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविले. यामुळे गस्तीची पायवाट, बुरुजाचा परिसर दिसू लागला आहे.

पुणे, पिंपरी- चिंचवडसह राज्यातील शिवप्रेमी मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी पावणेसात वाजता मोहिमेला सुरवात केली. त्यानंतर, दोन टप्प्यांत कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले. कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करून तीन वेगवेगळ्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. छत्रपती राजाराम महाराजांची पुण्यतिथी बुधवारी (ता. 22) असून, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

छत्रपती राजाराम महाराज समाधिस्थळ परिसर, लोकमान्य टिळक निवासस्थान व महात्मा गांधी निवासस्थानालगतचा परिसर व त्याभोवतालचे बुरुंज व तटबंदीची स्वच्छता करण्यात आली. गवत, काटेरी झुडपे हटवून पदपथ मोकळा करण्यात आला. तटबंदी व बुरुजांवरचा काही भाग गवत, झुडपांत व मातीखाली गाडला गेला होता, तो कार्यकर्त्यांनी मोकळा करून प्लॅस्टिक बाटल्या, कचरा मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला.

गोऱ्हे बुद्रुकचे सरपंच सचिन पासलकर यांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीची पूजा केली.

कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्था उपजिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी केली. मोहिमेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी विजय कोल्हे यांनी केली. हास्य कलाकार नंदकुमार बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन वाघ, महिला आघाडीच्या सुजाता वाघ, सुशांत खिरीड, उमेश पायगुडे, कुंडलिक खिरीड उपस्थित होते. मोहिमेत सव्वाशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवव्याख्यात्या रसिका वरूडकर यांनी गडसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते, सांबरेवाडी वन संरक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय जोरकर, अरविंद बोरुडे, श्रीनिवास गोगावले, सतीश देशमुख यांनी संयोजन केले.

Web Title: cleanign campaign on sinhgad