सीएमचा डोळा पुण्याच्या महापौरांवर! 

सीएमचा डोळा पुण्याच्या महापौरांवर! 

पुणे : निवडणुकीआधीच विरोधकांना घायाळ करण्याची रणनीती आखलेल्या भारतीय जनता पक्षाने पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्यासाठीच गळ टाकला होता. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर जगताप यांना भाजप प्रवेशाची 'ऑफर' दिली. मात्र आपण राष्ट्रवादीमध्येच समाधानी असल्याचे सांगत महापौरांनी मुख्यमंत्र्यांचा बाण परतवून लावला. 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर जगताप व अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. उपमहापौर मुकारी अलगुडे भाजपत प्रवेश करत असल्याबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा ऐकताना उपमहापौरच काय आमचा डोळा महापौरांवरच असल्याचे फडणवीस जगताप यांना म्हणाले. त्यावर मी राष्ट्रवादीतच समाधानी असून पवार कुटुंबीयांचे माझ्यावर अनंत उपकार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या 'ऑफर' ला नकार दिला.

ज्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्ष कमकुवत आहे अशा ठिकाणी कॉंग्रेस वा राष्ट्रवादीतून तगडे उमेदवार भाजपत आणण्याची जबाबदारी विशिष्ट लोकांकडे सोपविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला. महापौर त्या गळात अडकले नाहीत. मात्र राष्ट्रवादीतील अनेकजण आतापर्यंत भाजपवासी झाले आहेत. बुधवारी आचारसंहिता जाहीर झाली असून आता खरा वेग येणार आहे. येत्या काळात कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या महापालिकेतील गेल्या दहा वर्षातील सत्तेत विविध पदे भोगलेल्या अनेकजणांचा समावेश आहे. बापू कर्णे गुरुजी, दिनेश ऊर्फ पिंटू धावडे, अनिल टिंगरे, कॉंग्रेसमधून माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, नगरसेविका शीतल सावंत यांनी भाजपत प्रवेश केला आहे. दोन्ही कॉंग्रेससह मनसे व शिवसेनेतूनही पदाधिकारी तसेच अनेक आजी-माजी नगरसेवक येत्या काही दिवसात मोठ्याप्रमाणात भाजपत प्रवेश करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com