झुरळ मारले किती, उरले किती? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनात उंदीर व झुरळांचा सुळसुळाट झाल्याने तेथे औषध फवारणी करण्यात आली. या तत्परतेचे कौतुक होण्याची शक्‍यता कमी असून, आता आपल्याला दुसऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आरोग्य विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

पुणे - पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनात उंदीर व झुरळांचा सुळसुळाट झाल्याने तेथे औषध फवारणी करण्यात आली. या तत्परतेचे कौतुक होण्याची शक्‍यता कमी असून, आता आपल्याला दुसऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आरोग्य विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

या उपाययोजनेत किती लिटर औषध फवारले, त्यासाठी किती खर्च आला, अशा प्रश्‍नांसह या कारवाईत नक्की किती उंदीर व झुरळे मारली गेली, असा प्रश्‍न माहितीच्या अधिकारात विचारला जाण्याची धास्ती या विभागाने घेतली आहे. यामुळे या विभागात कोणी सामान्य नागरिक काम घेऊन गेल्यास झुरळांची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे, तुम्ही नंतर या, असे उत्तर त्या नागरिकाला ऐकायला लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मंत्रालयात आठवडाभरात तीन लाख 19 हजार 432 उंदीर मारले गेल्याची आकडेवारी उपलब्ध असण्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत किती उंदीर व झुरळे मारले, याचीही उत्सुकता अनेकांना आहे. पुण्यात भटक्‍या कुत्र्यांची नेमकी किती संख्या आहे, याची माहिती अद्याप प्रशासनाकडे नाही. त्या पार्श्‍वभूमीवर उंदीर व झुरळांची आकडेवारी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. तरी एकाही जागरूक लोकप्रतिनिधीचे अद्याप या प्रश्‍नाकडे लक्ष गेलेले नाही. 

या कारवाईबाबत प्राणिमित्र संघटनांच्या पातळीवरही अद्याप दखल घेतली गेले नसल्याचे चित्र आहे. उंदीर व झुरळांची नेमकी संख्या किती आहे, याची माहिती नसताना कशाच्या आधारावर फवारणीचा निर्णय घेतला, असा प्रश्‍न ते विचारू शकतात. 

अर्थात, या प्रश्‍नावर राजकारण रंगण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. फक्त पदाधिकाऱ्यांच्या दालनातच उंदीर व झुरळे झाली आहेत का? महापालिकेतील इतर ठिकाणी फवारणी का झाली नाही? यावर विरोधक आवाज उठवू शकतात. पदाधिकाऱ्यांना थोडा जरी त्रास झाला, की प्रशासन त्यावर तातडीने उपाययोजना करते. मात्र, शहरातील समस्त झुरळांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे काय धोरण आहे, याचा सवाल सर्वसाधारण सभेत अद्याप एकाही नगरसेवकाने विचारलेला नाही, हेदेखील वास्तव आहे.

Web Title: Cockroaches issue in pmc