थंड पेयांची बेकायदा विक्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

आरोग्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष, एफडीएही ‘थंड’च

पिंपरी - उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्यावरील सरबत, ज्यूस व तत्सम थंड पेय व पदार्थांचा अस्वाद घेण्यात सुरवात केली आहे. मात्र, परवानगीशिवायच या पेयांची चौकाचौकांत विक्री सुरू आहे. आरोग्यासाठी ही पेये योग्य की अयोग्य याची शहानिशा करणारे अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) अद्याप ‘थंड’च आहे.

आरोग्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष, एफडीएही ‘थंड’च

पिंपरी - उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्यावरील सरबत, ज्यूस व तत्सम थंड पेय व पदार्थांचा अस्वाद घेण्यात सुरवात केली आहे. मात्र, परवानगीशिवायच या पेयांची चौकाचौकांत विक्री सुरू आहे. आरोग्यासाठी ही पेये योग्य की अयोग्य याची शहानिशा करणारे अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) अद्याप ‘थंड’च आहे.

उन्हाळ्यात शरीरातील तापमानाचा समतोल राखण्यासाठी नागरिक थंड पेयांना प्राधान्य देतात. डॉक्‍टरही थंड पेये पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे फ्रूट ज्यूस, सरबते, ताक, लस्सी, नीरा, बर्फाचा गोळा, उसाचा रस, आइस्क्रीम आदी पदार्थांची दुकाने ‘हाउसफुल’ आहेत. मात्र, ही शीतपेये आरोग्यास हितकारक आहेत की नाहीत याची तपासणी करण्याची, तसेच त्याच्या विक्रीला परवानगी देण्याची जबाबदारी ‘एफडीए’वर आहे. ‘अन्नसुरक्षा व मानके’ कायद्यानुसार अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाऱ्या सर्वच फिरस्त्यांना ‘एफडीए’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे; परंतु अनेकांची तशी नोंदणी झालेली नाही.

औद्योगिक बर्फाचा वापर
परवाना असलेले बर्फाचे चार कारखाने आहेत. महापालिकेच्या वतीने पुरवठा होणाऱ्या पाण्यापासून या कारखान्यांत बर्फ तयार केला जातो. फक्त हाच बर्फ खरेदी करणे आवश्‍यक आहे. परंतु, अनेक शीतपेये विक्रेते औद्योगिक कारणांसाठी वापरला जाणारा बर्फ खरेदी करून त्याचा वापर व विक्री करीत आहेत. 

अद्याप कारवाई नाही
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगांचा वापरून शीतपेयांची विक्री केली जाते. प्रत्यक्षात नैसर्गिक रंगांचे किंवा ‘आयएसआय’ मार्क असलेले रंगच वापरणे आवश्‍यक आहे. तसेच, चवीसाठी वापरले जाणारे पदार्थ हे प्रमाणितच आणि योग्य प्रमाणातच असायला हवेत. मात्र, हे नियम धाब्यावर बसवून आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत अशा पदार्थांची तपासणी झाल्याचे ऐकिवात नाही.

मागील वर्षी बर्फाच्या दोन नमुन्यांची तपासणी केली होती. त्या दोन्हींमध्ये आरोग्यास हानिकारक असलेला ‘ई-कोलाय’ आढळून आला होता. यंदा प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. तथापि, लवकरच ही मोहीम हाती घेण्यात येईल. दोषी आढळून येणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल केले जातील.
- ए. जी. भुजबळ, सहायक आयुक्त, एफडीए

या थंड पेयांमुळे होणारे आजार
दूषित बर्फ व पाण्यामुळे : 
टायफॉईड, कावीळ, जुलाब, उलट्या, विषबाधा

रसायन व अनैसर्गिक रंग :  
घशाचे आजार, खवखव, ॲलर्जी

Web Title: cold drinks illegal sailing