जुन्नर एज्युकेशनच्या शाळेविरुद्ध तक्रार

maharashtra police
maharashtra police

आरटीआयअंतर्गत प्रवेश दिलेल्या मुलांच्या पालकांकडून शुल्क वसूल

जुन्नर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीआय) 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या मुलांच्या पालकांकडून शुल्क वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.

मोफत प्रवेश कोट्यातून शाळेने प्रवेश दिलेल्या बालकांच्या पालकांकडून वर्षाची संपूर्ण फी वसूल केली असल्याचे लाभार्थी पालकांच्या पडताळणीत व त्यांनी दिलेल्या जबाबावरून स्पष्ट झाले आहे. असे प्रवेश मिळालेल्या मुलांकडून फी घेता येत नसताना या मुलांच्या पालकांकडून 2014-15 ते 2016-17 या तीन वर्षांत शाळेची फी वसूल करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. 2014-15 अखेरपर्यंतचा फी परतावा शाळांना दिला असताना शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन यांनी संगनमताने ही बाब पालकांना कळविली नाही. शाळेने वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी 2014-15 व 2015-16 या वर्षात 56 प्रवेश दिले आहेत. या प्रवेश दिलेल्या मुलांकडून फी वसूल करून शाळा व संस्थेने पालक आणि सरकारची फसवणूक केली आहे.

तक्रारीत नफेखोरीचा उल्लेख
शाळा 2001 पासून सुरू असून संस्थेने डिसेंबर 2017 पर्यंत एकाही कर्मचाऱ्याचा ईपीएफ तसेच व्यवसाय कर, आयकर भरला नाही. ज्या शिक्षकांना नियुक्ती आदेशच दिलेले नाहीत अशा शिक्षकांना एकमुठी वेतन दिले आहे. शिक्षकांचे सेवापुस्तक ठेवले नाही, अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची गळचेपी केली आहे. शाळेच्या अंदाजपत्रकात घसारा म्हणून 2016-17 ते 2019-20 या चार वर्षांत विविध रक्कम दाखविली असताना ती पालकांकडून वसूल करणे म्हणजे चक्क नफेखोरी सिद्ध होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी
शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शैलेंद्र काजळे, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष नितीन कांतिलाल मेहता, संस्थेचे सचिव तथा शाळा समिती सदस्य सुधीर मनोहर ढोबळे, सदस्य धनेश चुनीलाल संचेती, सदस्य अविनाश विठ्ठलराव थोरवे, सदस्य नेहा भरत सदाकाळ यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी असे नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com