काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी लवकर व्हावी - खा. सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
शुक्रवार, 25 मे 2018

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जितकी लवकर होईल तितके मतभेद संपविण्यासह एखादे पाऊल पुढे मागे करायलाही वेळ मिळू शकतो, त्यामुळे ही आघाडी व कार्यकर्त्यांचे मनोमिलन यासाठी वेळ जाऊ नये अशी आपली भूमिका आहे. - खासदार सुप्रिया सुळे

बारामती शहर - राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी लवकरात लवकर व्हावी असा माझा स्वतःचा वैयक्तिक प्रयत्न असल्याची स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बोलून दाखविली. बारामतीतील पोस्ट कार्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, ही आघाडी जितकी लवकर होईल तितके मतभेद संपविण्यासह एखादे पाऊल पुढे मागे करायलाही वेळ मिळू शकतो, त्यामुळे ही आघाडी व कार्यकर्त्यांचे मनोमिलन यासाठी वेळ जाऊ नये अशी आपली भूमिका आहे. दोन्ही पक्षांना थोडे कमी जास्त करावे लागेल पण आघाडी व्हावी असे आपल्याला मनापासून वाटते.

चांगली राजकीय आघाडी झाली आणि मतांचे विभाजन झाले नाही तर खूप चांगला बदल राज्यात बघायला मिळेल, असा विश्वासही सुळे यांनी बोलून दाखविला. आगामी निवडणूकीत महाराष्ट्रातील राजकीय चित्र शंभर टक्के बदलेल, राज्यात मुख्यमंत्री जरी निवडणूका जिंकत असले तरी केवळ निवडणूका जिंकणे म्हणजे सर्व काही नसते, या राज्यातील जनता दुःखी असून काय उपयोग असे त्यांनी विचारले. 

शेतक-यांना हमी भाव नाही, अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला, सरकार कसला विचारच करायला तयार नाही, यांच्या मनात नेमक चाललय तरी काय हेच समजेनासे झाल्याचे सुळे म्हणाल्या. 

आकडोंसे पेट नही भरता...
आमचे सरकार होते तेव्हा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, आकडोंसे पेट नही भरता है, भूक लगती है तब धान लगता है....आज मलाच तो प्रश्न भाजपला विचारायचा आहे, मी संसदेत भाजपला हाच प्रश्न विचारणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

भुजबळांबद्दल गैरसमज पसरविला गेला
छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचा गेम केला हा आरोप धादांत खोटा असून छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असून 10 जूनच्या कार्यक्रमाला ते पुण्यात व्यासपीठावर उपस्थित असतील, असा खुलासा करत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी व भुजबळ यांच्या विरोधातील हे षढयंत्र असल्याचे सांगत या आरोपातील हवाच काढून घेतली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Congress and NCP should lead together early says supriya sule